तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अचानक खालावल्याने सध्या अम्मांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल संध्याकाळी जयललिता यांना हदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाल्यापासूनच अम्मांचे समर्थक रूग्णालयाबाहेर ठाण मांडून बसले आहेत. जयललिता यांच्या अनेक महिला समर्थक रूग्णालयाबाहेर धाय मोकलून रडताना दिसत होत्या. त्यांच्याकडून अम्मांची प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना सुरू आहेत. काल रात्रीपासूनच अनेकदा अम्मा दीर्घायुषी व्हा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. दरम्यान, अपोलो रूग्णालयाने सोमवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार जयललिलता यांची प्रकृती चिंताजनक आहे. आमचे डॉक्टर्स जयललिता यांची प्रकृती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, असे अपोलो रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती अस्थिर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या आमदारांना चेन्नईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, काहीवेळापूर्वीच तामिळनाडूमध्ये दगडफेक झाल्याने बससेवा बंद करण्यात आली आहे.
K'taka State Road Transport Corp temporarily stop bus services to Tamil Nadu aftr incident of stone pelting on their bus near Tiruvannamalai pic.twitter.com/XHsWNlC2kw
— ANI (@ANI) December 5, 2016
K'taka State Road Transport Corp temporarily stop bus services to TN after an incident of stone pelting near Tiruvannamalai-Latha, KSRTC PRO
— ANI (@ANI) December 5, 2016
#TopStory-Heavy police deployment outside Apollo hosp,Chennai. CRPF on high alert after TN CM #Jayalalithaa suffered cardiac arrest,last eve
— ANI (@ANI) December 5, 2016
तामिळनाडूतील राजकारण हे नेहमीच कमालीचे व्यक्तिपूजक राहिले आहे. गेल्या चार-सहा दशकांचा राज्यातील राजकारणाचा आढावा घेतला तर यात आजही बदल झालेला नाही. भावनिक आवाहनाचा मोठा परिणाम तामिळनाडूच्या राजकारणावर होतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कमालीच्या भावनिक मतदारांमुळे अम्मांचे आजारपण संवेदनशील विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच तामिळनाडूत हायअलर्ट जारी करण्यात आला असून केंद्रीय सुरक्षा दले आणि स्थानिक पोलिसांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काहीवेळापूर्वीच चेन्नई शहरात शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. ताप व शरीरातील पाणी कमी झाल्याने जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले. मात्र उपचार व त्याच्याशी निगडित बाबींवर गोपनीयता बाळगण्यात आली. परदेशातून डॉक्टर आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांतून बरेच काही येत होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने याबाबत सातत्याने विचारणा केली. जयललितांना रुग्णालयात दाखल केल्यावर बऱ्याच अवधीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पनीरसेलवन यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती हे सारेच अनाकलनीय होते. स्थानिक वाहिन्यांवर जयललितांची रुग्णालयातील काही छायाचित्रे दाखवण्यात आली. तसेच त्यांना भेटायला जी विविध पक्षांची नेतेमंडळी आली त्यांना खुद्द जयललितांना भेटूच दिले नाही. डॉक्टरांशीच त्यांनी संवाद साधला. अर्थात रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून ही खबरदारी घेणे योग्यच आहे. या सगळ्या घडामोडी पाहता एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच आहे.