Supporters of Sheikh Haseena protests outside UN against Muhammad Yunus : न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर शुक्रवारी अनेक बांगलादेशी नागरिकांनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या विरोधात आंदोलन केले, आंदोलन करणारे बांगलादेशी नागरिक पंतप्रधानपदावरून हटवलेल्या शेख हसीना यांचे समर्थक होते.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलकांनी ‘युनूस पाकिस्तानी आहेत, पाकिस्तानात परत जा’ अशा घोषणा यावेळी दिल्या. बांगलादेशात हिंदू आणि इतर धर्माच्या लोकांसह अल्पसंख्यांकांना मोठ्या प्रमाणावर अत्याचारांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

या आंदोलनाचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये UN मुख्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी जमल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये लोकांच्या हातात ‘बांगलादेशात अल्पसंख्यांकाच्या हत्या थांबवा’ आणि ‘बांगलादेशातील इस्लामी दहशतवादाला नकार द्या’ अशा आशयाचे बॅनर पाहायला मिळाले.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रात सहभागी होण्यासाठी जागतिक नेते एकत्र आले आहेत, यादरम्यान हे आंदोलन केले जात आहे. “आम्ही युनूस यांच्या बेकायदेशीर राजवटीविरोधात आंदोलन करत आहोत, कारण ५ ऑगस्ट २०२४ रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडून जावे लागले आणि युनूस यांनी देश ताब्यात घेतला आणि तेव्हापासून अल्पसंख्यांक, हिंदू आणि दुसऱ्या धर्मातील लोकांची हत्या केली जात आहे,” असे एका आंदोलनकर्त्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले.

एका आंदोलकाने पुढे आरोप केला की, अनेक लोकांना, विशेषतः हिंदूंना, बांगलादेश सोडून जावे लागले आहे. “बांगलादेशात अत्यंत वाईट परिस्थिती आहे, आणि म्हणूनच लोक येथे आंदोलनात सहभागी झाले आले आहेत. युनूस यांनी सत्ता सोडली पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजेत” असेही त्याने नमूद केले.

दुसऱ्या एका आंदोलकांने मुहम्मद युनूस बांगलादेशला ‘तालिबान’ आणि ‘दहशतवादी देश’ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. “आम्ही आज येथे युनायटेड नेशन्सच्या समोर डॉ. युनूस यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलो आहोत, जे बांगलागेशला तालिबान देश, एक दहशतवादी देश बनवत आहेत आणि ते हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि सर्व धर्मीय अल्पसंख्यांकांविरोधात अत्याचार करत आहेत…,”असे एक आंदोलक म्हणाला.

युनूस यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) आपले भाषण दिले. गेल्या वर्षी बांगलादेशातील तरूणांनी केलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांचे १५ वर्षांचे शासन संपुष्टात आले, त्यानंतर युनूस यांचे हे महासभेतील दुसरे भाषण होते.