Supreme Court clean chit to Vantara : रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. एसआयटीने तीन दिवसांपूर्वी त्यांचा चौकशी अहवाल सादर केला आणि यावर आज न्यायालयने सुनावणी घेतली. न्यायालयाने यावेळी वनताराला क्लीन चिट दिली आहे.
न्यायालयाने म्हटलं आहे की “आमच्या वतीने गठीत केलेल्या एसआयटीने ‘वनतारा’शी संबंधित सर्व आरोपांप्रकरणी तपास केला असून वन विभागाकडून हत्ती घेण्याच्या प्रक्रियेत काहीही नियमबाह्य आढळलेलं नाही. तसेच, वनतारामध्ये त्यांना नियमानुसार ठेवण्यात काहीही चुकीचं नाही. वनतारा वन विभागाकडून हत्ती घेत असेल आणि संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार पार पाडली जात असेल तर यात चुकीचं काय आहे? एसआयटीच्या तपासात आढळलं आहे की वनताराकडून सर्व नियमांचं पालन केलं जात आहे.”
एसआयटीकडून वनतारामधील तथ्य तपासणी
‘वनतारा’विरोधात कायद्यांचे पालन न करणे, भारतासह परदेशातून प्राणी आणणे, विशेषत: हत्तींसारखे प्राणी आणल्याचा आरोप आहे. प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांवरील वृत्ते, तसेच स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव संघटनांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे ‘वनतारा’विरुद्ध अनियमिततेचा आरोप करणाऱ्या दोन जनहित याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी ‘वनतारा’विरुद्ध तथ्य तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय ‘एसआयटी’ची स्थापना केली होती.
चेलमेश्वर यांच्याव्यतिरिक्त या एसआयटीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, माजी आयआरएस अधिकारी अनीष गुप्ता यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या ‘एसआयटी’ने शुक्रवारी अहवाल सादर केला. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा अहवाल दाखल करून घेत १५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली.
या सुनावणीवेळी न्यायमूर्ती मिथल व वराळे यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की “एसआयटीच्या अहवालात आढळलं आहे की वनतारामध्ये नियमांचं योग्यरित्या पालन केलं जात आहे. तिथे वन्यजीवांना ठेवण्यात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.”
“…तर त्यात चूक काय?” न्यायालयाचा प्रश्न
दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी मंदिरातील हत्तींचा मुद्दा उपस्थित केला. यावर न्यायमूर्तींनी विचारलं की “मंदिरातील हत्तींची योग्य काळजी घेतली जात नाही हे तुम्हाला कसं कळतं?” न्यायमूर्ती म्हणाले, “आपल्या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला अभिमान वाटू शकतो. त्या गोष्टींना अनावश्यक वादात अडकवू नका. एखाद्याला हत्ती पाळायचा असेल आणि तो सर्व नियमांचं पालन करून हत्ती पाळत असेल, त्यांची देखभाल करत असेल तर त्यात चूक काय?