पीटीआय, नवी दिल्ली
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांना रुग्णालयात नेले जात असताना प्रसारमाध्यमांसमोर का नेले, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला विचारला. अतिक आणि अश्रफ हे दोघे प्रयागराजमध्ये पोलीस कोठडीत असताना १५ एप्रिलला पोलिसांसमोर त्यांचा खून झाला. त्या वेळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते.
अतिक अहमद आणि अश्रफ अहमदच्या खूनप्रकरणी स्वतंत्र तपास करावा, अशी मागणी करणारी याचिका ॲड. विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या दोघांना रुग्णालयात नेले जात आहे याची माहिती मारेकऱ्यांना कशी मिळाली, असा प्रश्नही न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य सरकारला विचारला. ‘त्यांना कसे माहीत पडले? आम्ही हे टीव्हीवर पाहिले आहे. रुग्णवाहिका थेट रुग्णालयाच्या दरवाजापर्यंत का नाही नेली? त्यांना पायी का चालवत नेले?’ असे प्रश्न न्या. रवींद्र भट आणि न्या. दीपंकर दत्ता यांनी उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांना विचारले.
त्यावर राज्य सरकार या घटनेचा तपास करत असून त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती रोहतगी यांनी दिली. मारेकरी बनावट ओळखपत्राचा वापर करून आले होते, असेही त्यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला घटनेनंतर केलेल्या उपाययोजनांबद्दल स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले