Supreme Court on Bhupesh Baghel Plea : बऱ्याचदा प्रभावी व श्रीमंत व्यक्ती फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळावा यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागतात, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळा व इतर गुन्ह्यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या बेंचने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न विचारला की “एफआयआर, अटक, रिमांड व मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींविरोधातील तुमच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने काय विचारायला हवा? मुळात तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत? श्रीमंत लोक थेट सर्वोच्च न्यायालयात का येतात?”
न्यायमूर्ती म्हणाले, “उच्च न्यायालय देखील संवैधानिक आहे. तिथेही अशा प्रकरणांमध्ये निकाल दिला जातो. आम्हाला असं विचारावं लागतंय कारण आम्ही या समस्येशी सामना करत आहोत. उच्च न्यायालय अशा प्रकरणांमध्ये निकाल देऊ शकत नाही किंवा न्यायनिवाडा करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर त्या न्यायालयांचा काय फायदा?”
याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय?
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व त्यांचे पुत्र चैतन्य बघेल यांनी तपास यंत्रणांची दंडात्मक कारवाई व पीएमएलए कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
याचिकाकर्त्यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ते कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की संपूर्ण देशभर अटकेचं सत्र चालू आहे. सक्तवसुली संचालनालयासारख्या (ईडी) तपास यंत्रणा तुकड्या-तुकड्यांमध्ये आरोपपत्र दाखल करत आहेत. त्यांच्या मनाला वाटेल त्या व्यक्तीला ते वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवत आहेत.
भूपेश बघेल यांचा ईडीच्या कारभारावर आक्षेप
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर झालेले कपिल सिब्बल म्हणाले, “हे असले प्रकार चालणार नाहीत, प्राथमिक आरोपपत्रात ज्यांची नावं नसतात ती नावं अचानक पुरवणी आरोपपत्रात बघायला मिळतात. त्यानंतर त्यांना तातडीने आटकही केली जाते.” तर बघेल यांचे पूत्र चैतन्य यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर झालेले अभिषेक सिंघवी म्हणाले, “सुरुवातीच्या दोन-तीन आरोपपत्रांमध्ये माझ्या आशिलाचं नाव नव्हतं. परंतु, मार्च महिन्यात अचानक त्यांच्या घरी धाड टाकण्यात आली. त्यानंतर ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. त्या आरोपपत्रात चैतन्य बघेल यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आणि त्यांना अटकही करण्यात आली.”