Supreme Court calls Delhi air pollution very very serious : दिल्लीतील हवा प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील गुरूवारी धोकादायक पातळीवर पोहचलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल भाष्य केले आहे. न्यायालयाने दिल्लीतील परिस्थितीत ही अत्यंत गंभीर असल्याचे सांगत वकिलांना सुनावणीसाठी प्रत्यक्षात हजर राहण्यापेक्षा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सलग तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवा धोकादायक पातळीवरच होती. शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा गंभीर (Severe) श्रेणीत कायम राहिला आणि अनेक मॉनिटरिंग स्टेशन्सवर हे आकडे ४०० च्या पुढे गेले होते.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार , “परिस्थिती खूप खूप गंभीर आहे! तुम्ही सगळे इथे कशाला येत आहात? आपल्याकडे व्हर्च्युअल सुनावणीची सुविधा आहे. कृपया तिचा लाभ घ्या. या प्रदूषणामुळे कायमस्वरूपी नुकसान होईल,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
दिल्लीतील बिघडत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अतुल एस. चंद्रुकर यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.
वरिष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात उपस्थित होते, त्यांनी नमूद केले की अनेक वकील हे आधीच मास्क वापरत आहेत. यावर न्यायामूर्ती नरसिंहा म्हणाले की, “मास्क देखील पुरेसे नाहीत. ते पुरेसे ठरणार नाही. आम्ही याबद्दल सरन्यायधीशांबरोबर देखील चर्चा करू.”
दिल्ली हवेची गुणवत्ता
दिल्लीतील एकूण ३७ हवा गुणवत्ता मॉनिटरिंग स्टेशन्सपैकी गुरूवारी २७ स्टेशन्सवर गुणवत्ता गंभीर एक्यूआयच्या पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक प्रभावित झालेल्या काही भागांमध्ये बुरारी (४३३), चांदनी चौक (४५५), आनंद विहार (४३१), मुंडका (४३८), बावाना (४६०), आणि वझीरपूर (४५२) यांचा समावेश होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, ४०१ ते ५०० दरम्यानचा AQI गंभीर श्रेणीत येतो, ज्यामुळे निरोगी व्यक्तींच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
दिल्लीमध्ये मंगळवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४२८ होता. डिसेंबर २०२४ नंतरची हा पहिल्यांदाच या पातळीवर पोहचला आहे. यादरम्यान बुधवारी सीजेआय बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने पंजाब आणि हरियाणा राज्यातील सरकारांना पराली जाळणे रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची विचारणा केली होती.
