Chief Justice Bhushan Gavai On Nepal : नेपाळमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आणि अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. निदर्शकांचा संताप एवढा होता की त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ करण्यात आली. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नेपाळमधील परिस्थितीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील प्रतिक्रिया देत नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘आपल्याला आपल्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे’, असं म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेपाळमधील हिंसाचाराच्या घटनांवर टिप्पणी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई काय म्हणाले?
नेपाळमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा संदर्भ देऊन भारतीय संविधानाची ताकद भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी अधोरेखित केली. सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी म्हटलं की, “आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे. शेजारील देशांमध्ये काय चाललं आहे ते पाहा,” असं सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलं.
माजी पंतप्रधानांचं घर पेटवलं
नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर निदर्शकांनी हल्ला केला. यावेळी नासधूस करून घर पेटवून देण्यात आलं. यावेळी घरात अडकलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर या आगीत होरपळू गंभीर जखमी झाल्या, ज्यानंतर त्यांचे मंगळवारी निधन झालं, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. नेपाळची राजधानी काठमांडूच्या दल्लू भागात हा धक्कादायक प्रकार घडला. चित्रकर यांना तातडीने किर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी सांगितलं.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचं घर देखील आंदोलकांनी पेटवून दिलं. सोशल मीडियावर काही काळासाठी घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील आंदोलनाने अत्यंत हिंसक वळण घेतलं. यावेळी ओली यांच्या सरकारमधील अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल (६५) यांना देखील नेपाळच्या राजधानीत रस्त्यावर मारहाण करण्यात आली, याचा अत्यंत भयानक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे.