Supreme Court on Khajuraho Temple Lord Vishnu Idol Restoration : मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून तिथे नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टाइन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येतं.
याचिकाकर्ते राकेश दलाल यांची विनंती ऐकल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असा दावा करता की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. ते एक पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारं स्थळ आहे. तिथे काहीही करायचं असेल तर एएसआयची परवानगी घ्यावी लागते. या प्रकरणात आम्ही दखल देऊ शकत नाही याबाबत आम्हाला खेद वाटतो.”
याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?
याचिकाकर्त्याने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं की “मुघलांच्या काळात त्यांच्या सैनिकांनी खजुराहोमधील मंदिरांवर हल्ले केले. मंदिरांची लूट केली आणि परिसरात नासधूस केली. काही मंदिरं आणि मूर्तींची विटंबना केली. मुघलांनीच या मूर्तीचं शीर तोडलं. मात्र, आता आपला भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली तरी ही मूर्ती दुरुस्त केली नाही. आजही मूर्ती तशाच अवस्थेत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविक या मंदिरात भगवान विष्णूची पूजा करू शकत नाहीत. यामुळे पूजा करण्याच्या आमच्या अधिकारावर गदा येत आहे.”
राकेश दलाल यांच्या याचिकेत खजुराहो मंदिराच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे मंदिर चंद्रवंशी राजांनी बांधलं होतं. मात्र मुघलांनी या मंदिरावर आक्रमण करून मंदिराचं बरंच नुकसान केलं. त्यानंतर इंग्रजांचा काळात आणि आता स्वतंत्र भारतात या मंदिराची डागडुजी झाली नाही. विटंबना झालेल्या मूर्ती आजची तशाच अवस्थेत आहेत. सरकारने कधीही येथे डागडुजी केली नाही. हे मंदिर अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलं आहे.
आमच्या संवैधानिक अधिकारांवर गदा : याचिकाकर्ते
याचिकाकर्ते म्हणाले, “या मंदिराकडे लक्ष वेधण्यासाठी बरीच आंदोलनं झाली, मोर्चे काढले, मोहिमा राबवल्या तरी यावर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही. सरकारदरबारी आमच्या मुद्द्यांची दखल घेतली गेली नाही. मंदिरातील मूर्ती पाहून विष्णू भक्तांना आणि समस्त हिंदूंना खूप वाईट वाटतं. संविधानाने आम्हाला पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, मंदिरातील अशा अवस्थेतीत मूर्ती पाहून आमचा पूजेचा अधिकार हिरावला गेल्याची भावना निर्माण होते.”