Supreme Court gives anticipatory bail to cartoonist Hemant Malviya : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पर पडली. दरम्यान अशी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप असलेल्या मालवीय यांना आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे व्यंगचित्रकार मालवीय यांना काहीसा दिलासा मिळाला आहे .

मालवीय यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून माफी मागितल्याचे नमूद करत न्या. अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने जर व्यंगचित्रकाराने चौकशीत सहकार्य केले नाही तर हा जामीन रद्द करण्याची मुभा देखील पोलिसांना दिली आहे.

या सुनावणीदरम्यान मालवीय यांच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी न्यायालयाला सांगितले की, माफी मागण्यात आली आहे आणि याचिकाकर्त्याला अद्याप समन्स बजावण्यात आलेले नाही. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी यावर जेव्हा सर्व पुरवे गोळा केले जातील तेव्हा समन्स बजावला जाईल अशी माहिती दिली.

मालवीय यांच्याविरोधात इंदोर येथील एक वकील आणि आरएसएस कार्यकर्ते विनय जोशी यांनी तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप केला होता.

१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. कुमार आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने मालवीय यांना कारवाईपासून संरक्षण दिले होते.

यापूर्वी मालवीय यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचीसर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती, ज्यामध्ये मालवीय यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आणि मनापासून माफी मागितली होती.

नटराज यांनी असा युक्तिवाद केला होता की तपास प्रलंबित आहे आणि ही पोस्ट संबंधित पुराव्याचा भाग असू शकते आणि या टप्प्यावर ती डिलीट करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.