दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरी ते तिहार तुरुंगातून नेमके कधी बाहेर येतील? पुढे नेमकं काय होणार? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना मिळालेल्या जामीनाची मुदत केवळ १ जून पर्यंत असणार आहे. त्यानंतर २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आत्मसमर्पण करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत.

हेही वाचा – “पंतप्रधान मोदी भानावर नाहीत, त्यांची भाषणंही…” एनडीएत येण्याच्या प्रस्तावावरून संजय …

जामीन मिळाला पुढे काय?

इंडिआ टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला असला, तरी तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी त्यांना काही कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागणार आहे. सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मसुदा तयारी होईल. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अटी निश्चित करण्यात येईल. या जामीन अटी एकतर सर्वोच्च न्यायालयाकडून निश्चित केल्या जातील किंवा या अटी निश्चित करण्याचे आदेश सत्र न्यायालयाला दिले जातील. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत प्राप्त होईल.

पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी आदेशाची प्रत त्यांना सत्र न्यायालयात सादर करावी लागेल. त्यानंतर सत्र न्यायालयाद्वारे अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची औपचारीक प्रक्रिया पार पाडली जाईल. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांकडून जातमुचलक्याची रक्कम भरली जाईल. त्यानंतर सत्र न्यायालयाद्वारे अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचे आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पार पडली, तर आज सांयकाळपर्यंत अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांना दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेबाबत त्यांचे वकील शादान फरासत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अरविंद केजरीवाल लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. आज ते तुरुंगातून बाहेर येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” असे ते म्हणाले.