नवी दिल्ली :Delhi Chief Minister Arvind Kejriwal Bail मद्याविक्री घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. केजरीवाल यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवणे गैर असल्याचे सांगताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील एका न्यायमूर्तींनी याबद्दल सीबीआयची कानउघाडणीही केली. न्यायालयाने आदेश प्राप्त होताच शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केजरीवाल यांची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली.

केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्लीच्या सचिवालयात जाण्यास मज्जाव केला असून नायब राज्यपालांच्या परवानगीविना कोणत्याही फायलीवर स्वाक्षरी करण्यास मनाई केली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणूक रणधुमाळीच्या मध्यात केजरीवाल यांची सुटका झाल्याने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून दिल्लीसह हरियाणातही आपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जल्लोष केला.

हेही वाचा >>> अदानी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने हाती घ्यावी – काँग्रेस

केजरीवाल यांना २१ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. या अटक प्रकरणामध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला होता. मात्र, फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये केजरीवाल यांना ‘सीबीआय’ने अटक केली होती. त्यामुळे केजरीवालांना तिहार तुरुंगातच राहावे लागले होते. त्याप्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला.

मद्याविक्री घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, ‘आप’चे नेते संजय सिंह तसेच, ‘भारत राष्ट्र समिती’च्या नेत्या के. कविता यांची गेल्या काही महिन्यांत जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यामुळे केजरीवाल यांना जामीन मिळणेही निश्चित मानले जात होते.

हेही वाचा >>> दक्षिण आफ्रिकेचे माजी मंत्री प्रवीण गोर्धन यांचे निधन

याआधी लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी केजरीवाल यांना हंगामी जामीन मंजूर झाला होता. मात्र, २ जूनला जामिनाची मुदत संपताच त्यांना अटक करण्यात आली होती. आता जामीन मिळाल्याने जम्मू-काश्मीर तसेच, हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येईल. केजरीवालांच्या सुटकेमुळे प्रामुख्याने हरियाणामध्ये आपला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.

एकमताने जामीन, निकालपत्र स्वतंत्र

जामीन देण्याचा आदेश न्या. सूर्यकांत व न्या. उज्ज्वल भुयान यांनी एकमताने दिला असला तरी, अटकेबाबत दोन्ही न्यायाधीशांनी स्वतंत्र निरीक्षण नोंदवले. केजरीवाल यांना सीबीआयने केलेली अटक कायदेशीर होती, असे सांगतानाच ‘दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवणे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील घाला ठरतो,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. न्या. उज्ज्वल भुयान यांनी मात्र, केजरीवाल यांना अटक करण्याच्या ‘सीबीआय’च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

निर्धार आणखी पक्का

●तिहार तुरुंगातून शुक्रवारी सायंकाळी सुटका झाल्यानंतर केजरीवाल यांचे ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यांचे आभार मानताना केजरीवाल यांनी ‘राष्ट्रविघातक शक्तींविरोधातील लढा सुरूच राहील,’ असे म्हटले.

●‘त्यांनी माझा निग्रह मोडण्यासाठी मला तुरुंगात डांबले. परंतु, तुरुंग मला मोडू शकत नाही. उलट आता मी आणखी खंबीर बनलो आहे,’ असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंजऱ्यातील पोपट बनू नका

न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी सीबीआयवर ताशेरे ओढले. ‘ईडी’च्या प्रकरणामध्ये केजरीवालांना जामीन मिळाला असतानाही त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ‘सीबीआय’ने ही कारवाई केली, असे निरीक्षण नोंदवतानाच ‘केजरीवाल यांना २२ महिने अटक न करणाऱ्या सीबीआयला ईडी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अटक करण्याची घाई कशी झाली’, असा सवाल त्यांनी केला. ‘सीबीआयने पिंजऱ्यातील पोपट असल्यासारखे वागू नये’ असा टोलाही लगावला.