अॅलोपॅथी उपचारपद्धती विरोधात बोलणाऱ्या बाबा रामदेव यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. बाबा रामदेव अॅलोपॅथी उपचार पद्धती आणि डॉक्टरांना विरोध का करत आहेत? असा प्रश्न सरन्यायाधीश रमण्णा यांनी उपस्थित केला. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीविरोधात दिलेल्या जाहिरातीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं ही टिप्पणी केली आहे.

हेही वाचा- मुस्लीम मंत्र्यासोबत मंदिरात गेल्यामुळे वाद, नितीशकुमार यांनी माफी मागण्याची भाजपाची मागणी

“रामदेव बाबांनी योग साधना लोकप्रिय केली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांचा आदर करतो मात्र, त्यांनी इतर उपाचाराच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको. त्यांनी दुसऱ्यांवर टीका करणे टाळावे”, असे न्यायालयाने म्हणले आहे.

न्यायमूर्ती सीटी रविकुमार म्हणाले की, अॅलोपॅथी उपचार पद्धतीची जणू खिल्ली उडवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि इतरांना नोटीस बजावून याबाबत उत्तर मागवले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. लसीकरण मोहीम आणि आधुनिक अॅलोपॅथी औषधांविरोधात देशात मोहीम चालवली जात असल्याचा आरोप आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) केला आहे.

हेही वाचा- “राकेश टिकैत दो कौड़ी का आदमी” केंद्रीय गृह राज्यमंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

योगगुरू बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक वैद्यक पद्धती यांच्यात नेहमीच वाद होत असतात. अलीकडेच रामदेव बाबांनी पुन्हा एकदा अ‍ॅलोपॅथीच्या वैद्यक पद्धतीवर हल्लाबोल करत प्रश्न उपस्थित केले होते. अ‍ॅलोपॅथिक औषध पद्धतीला लबाडीचा आजार असल्याचा आरोप करत या पॅथॉलॉजीमध्ये रुग्णांवर उपचार करणे शक्य नसल्याचे म्हणले होते. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अॅलोपॅथीवर उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.