Discussion on cricket during hearing in Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीवेळी एक विचित्र गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांनी एका वकिलाला त्यांच्या केस व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी ३० सेकंदांचा वेळ दिला. ज्यामुळे न्यायालयीन खटल्या व्यतीरिक्त क्रिकेटबद्दल हलकीफुलकी चर्चा झाली. एका फौजदारी खटल्यात आरोप निश्चित करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते. त्यावेळी न्यायालयात झालेली चर्चा आता समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे काय चुकले?

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील सुनावणीदरम्यान वकिलाच्या मागण्या फेटाळल्या होत्या.
जेव्हा वकिलाने त्यांचे युक्तिवाद मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला तेव्हा न्यायमूर्ती हृषिकेश रॉय विनोदाने म्हणाले, “ठीक आहे, आम्ही तुम्हाला ३० सेकंद देतो, पण आम्ही तुमची याचिका ताबडतोब फेटाळत आहोत.”

विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती रॉय यांनी याचिका औपचारिकपणे फेटाळल्यानंतर. त्यांनी वकिलाला विषय बदलण्यास सांगितले. ते म्हणाले “आता तुमच्याकडे ३० सेकंद आहेत. तुमच्या केस व्यतिरिक्त काहीही बोला. आपण क्रिकेटबद्दल का बोलू नये? ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या क्रिकेट संघाचे काय चुकले?”

या अनपेक्षित घटनेमुळे वकील गोंधळल्याचे पाहायला मिळाले. त्यांना यावेळी क्रिकेटबद्दल काहीच बोलता आले नाही. पुढे, न्यायमूर्ती रॉय यांनी न्यायालयातील गंभीर वातावणर हलके करण्यासाठी वकिलाला हा प्रश्न विचारल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान भारतीय क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. ज्यामध्ये भारताचा पराभव झाला होता.

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा आग्रह

न्यायमूर्ती हृषिकेश रॉय हे त्यांच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या गुणामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही लोकप्रिय आहेत, ज्यात माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश आहे. जेव्हा जेव्हा न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच खंडपीठाचा भाग असायचे तेव्हा, ते न्यायमूर्ती रॉय यांना हलक्याफुलक्या पद्धतीने सुनावणी संपवण्यासाठी आग्रह करायचे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ जानेवारीला निवृत्त होणार हृषिकेश रॉय

केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची सप्टेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ते या वर्षी ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत.