वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही एकच परीक्षा घेण्याचा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरवला. नीट परीक्षा घेण्याचा मेडिकल कौन्सिलचा निर्णय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे वैद्यकीय पदवी (एमबीबीएस), दंतवैद्यकीय पदवी (बीडीएस), आणि या दोहोंमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा राज्याराज्यांतील तसेच वेगवेगळय़ा शिक्षणसंस्थांमधील प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. मात्र त्याच वेळी या परीक्षेतील पात्रता गुणांच्या आधारे यंदा प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा निर्वाळा सरन्यायाधीश अल्तमस कबीर आणि न्या. विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठाने दिला.
नीट परीक्षेबाबत बरेच प्रश्न गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने उपस्थित केले जात होते. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नीट या वैद्यकीय पात्रता परीक्षेच्या अधिसूचनेस आक्षेप घेणाऱ्या ११५ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सरन्यायाधीश अल्तमस कबीर, न्या. विक्रमजित सेन आणि न्या. ए. आर. दवे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. विविध विद्यापीठांनी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित करण्यास तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास १३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली होती. आता या निर्णयामुळे सर्व विद्यापीठांना तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना आपापल्या प्रवेश परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायमूर्तीची मतभिन्नता
‘नीट’सारखी परीक्षा घेतली जाणे ही कायदेशीर, व्यावहारिक उपाययोजना असून आज समाजाला त्याची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गुणवत्तेच्या निकषावर अपात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कॅपिटेशन फी’ किंवा देणगीसारख्या अस्त्राचा वापर करून प्रवेश घेणे नीट परीक्षेमुळे शक्य झाले नसते. किंबहुना शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्तीला या परीक्षेमुळे आळा बसला असता. गुणवान विद्यार्थ्यांना यामुळे न्याय मिळाला असता, शिवाय भ्रष्टाचारासही पायबंद घालता आला असता. आणि म्हणून मी माझी मतभिन्नता नोंदवीत आहे,’ असे न्या. ए. आर. दवे यांनी निकालपत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे. दवे यांचे या निर्णयाबाबत वेगळे मत असल्यामुळे नीट परीक्षेबाबतचा निकाल खंडपीठाच्या बहुमताद्वारे जाहीर करण्यात आला.
न्यायालयाचे आक्षेप
* राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांपैकी १९, २५,२६,२९ आणि ३० व्या कलमाचे उल्लंघन
* शिक्षण राज्याच्याही अखत्यारीतील विषय असून नीट परीक्षेमुळे राज्ये आणि खासगी शैक्षणिक संस्थांच्या हक्कांवर गदा
* ही परीक्षा आकर्षक वाटली तरी यामुळे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधील दरी वाढण्याचीच अधिक शक्यता