काँग्रेसचे माजी नेता सज्जन कुमार याचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. १९८४ मध्ये उसळलेल्या शिख दंगलींच्या वेळी भावना भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात सज्जन कुमारने सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने हे अपिल फेटाळले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाली. त्यानंतर दिल्लीतील राजनगर भागात दंगली उसळल्या.

त्या दंगलीत पाच शीख व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी खासदार सज्जन कुमारसह सहा आरोपी होते. या सहा जणांवर २०१० मध्ये खटला सुरु झाला. दिल्ली हायकोर्टाने याप्रकरणी डिसेंबर २०१८ मध्ये निकाल देत सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात अपिल करत सज्जन कुमारने त्याच महिन्यात सुप्रीम कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र याचप्रकरणी निकाल देत सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.