वैद्यकीय आधारावर देण्यात आलेल्या अंतरिम जामिनास मुदतवाढ देण्यास नकार देताना हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. ओम प्रकाश चौताला यांची जागा तुरुंगातच आहे, रुग्णालयाचा पाहुणचार झोडण्याचा त्यांना हक्क नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने चौताला यांचा अर्ज फेटाळला.
शिक्षकभरती घोटाळ्याप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांना दोषी ठरवण्यात आले होते, तसेच त्यांची तुरुंगात रवानगीही करण्यात आली होती. मात्र तब्येत ढासळण्याच्या कारणास्तव त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. या जामिनास मुदतवाढ मिळावी, अशी विनंती चौताला यांच्यातर्फे करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली.
चौताला यांना रुग्णालयात राहण्याची गरज नसल्याचे प्रमाणपत्र ‘एम्स’च्या वैद्यकीय मंडळाने दिले होते. त्याचा दाखला देत, सर्वोच्च न्यायालयाने चौताला यांच्यावर आगपाखड केली. सत्तास्थानी असताना तब्येतीच्या कारणास्तव ते नाकारण्याचे धाडस न दाखविणारी बडी धेंडे एखाद्या प्रकरणात दोषी ठरली की मात्र रुग्णालयात वास्तव्य वाढविण्याचा प्रयत्न कशी काय करतात, असा सवाल न्यायालयाने केला. न्या. एच.एल. दत्तू आणि न्या. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश देताना चौताला यांची तब्येत व्यवस्थित असून त्यांनी उर्वरित उपचार तुरुंगातूनच घ्यावेत असे स्पष्ट केले.