नवी दिल्ली : अॅलोपॅथी आणि अॅलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर टीका करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, योगाचा प्रसार करणाऱ्या बाबा रामदेव यांनी अन्य उपचारपद्धतींवर टीका करू नये, अशी टीका करण्यापासून त्यांना रोखण्याची गरज आहे.
करोनाकाळात बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी या उपचारपद्धतीवर आणि करोना प्रतिबंधक लसीकरणावर टीका केली होती. रामदेव यांच्या वक्तव्यावरून आयएमएने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनीसह केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालयालाही नोटीस बजावली. या विभागांनीही बाबा रामदेव यांची बाजू लावून धरत आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींविरोधात मोहीम उघडली होती, असे या याचिकेत म्हटले आहे.
‘‘बाबा रामदेव यांना काय झाले आहे? योगा लोकप्रिय केल्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी इतर उपचारपद्धतींबाबत शंका घेऊ नये, त्यांनी इतर वैद्यकीय उपचारपद्धतींवर प्रश्न उपस्थित करू नये. आयुर्वेदिक उपचारपद्धतींमुळे रुग्ण आजारातून बरे होतील याची हमी तुम्ही घेऊ शकता का? सर्व डॉक्टरांवर ते मारेकरी आहेत, अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही दिल्या होत्या. त्या चुकीच्या असून अन्य उपचारपद्धतींवर तुम्ही टीका करू नये,’’ अशा शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव यांना फटकारले.
आयएमएच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अॅड. अमरजीत सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मितीत गुंतलेल्या कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी वारंवर निंदनीय वक्तव्ये करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. त्यात सातत्याने अॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीकाटीप्पणी केली जाते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव, आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालयाला नोटीस पाठवून १२ ऑगस्ट रोजी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण देशात लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांच्या विरोधात मोहीम सुरू असून ही एक गंभीर समस्या आहे. डॉक्टर हतबल झाले आहेत आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांवर अविश्वास ठेवण्यासाठी लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संस्थेने ही रिट याचिका दाखल केली आहे.
– अॅड. अमरजीत सिंह, ‘आयएमए’चे वकील