SC Slams Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलेल्या एका विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावलं आहे. २०२२ च्या डिसेंबर महिन्यात राहुल गांधींनी भारतीय लष्कराबाबत अवमानकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात राहुल गांधींविरोधात न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. ही याचिका वाईट हेतूने करण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत सुनावलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने?

“तुम्ही लोकसभा विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही तुमची मतं संसदेत मांडाययला हवीत, सोशल मीडियावर नाही”, असं राहुल गांधींना बजावतानाच न्यायालयाने त्यांच्या विधानावरही टिप्पणी केली. “चीननं भारताचा २ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला आहे, हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तिकडे होतात का? तुमच्याकडे याची काही विश्वासार्ह माहिती आहे का? जर नसेल तर मग तुम्ही अशी विधानं का करता?” असा सवाल न्यायालयाने राहुल गांधींना केला. तसेच, “जर तुम्ही खरे भारतीय असाल, तर तुम्ही असं विधान केलं नसतं”, असंही न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

“तुम्ही तुम्हाला हवं ते बोला. घटनेच्या कलम १९ अंतर्गत तुम्हाला ते अधिकार आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की एक जबाबदार लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही हे सगळं कराल”, असंही न्यायालयाने राहुल गांधींना बजावलं. अभिषेक मनु सिंगवी यांनी राहुल गांधींच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान, यावेळी न्यायालयाने राहुल गांधींवरील कारवाईला स्थगिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०२० साली भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही बाजूच्या सैन्यामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये अनेक सैनिक जखमी झाले होते. या मुद्द्यावरून भारत व चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. याचप्रमाणे २०१७ मध्ये देखील डोकलाम येथे अशाच प्रकारे दोन्ही बाजूंकडून लष्करी तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून आजतागायत दोन्ही देशांमधील तणाव निवळू शकलेला नाही. चीनक़डून भारतीय हद्दीत कायम केल्या जात असलेल्या कारवायांसंदर्भात राहुल गांधींनी २०२२ च्या डिसेंबर महिन्यात एक विधान केलं होतं.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

डिसेंबर २०२२ मध्ये राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने देशभर भ्रमण करत होते. त्यावेळी एका भाषणात बोलताना राहुल गांधींनी ‘चीनी सैनिक भारतीय जवानांना अरुणाचलमध्ये झोडपून काढत होती आणि प्रसारमाध्यमे यासंदर्भात काहीही दाखवणार नाहीत’, अशा आशयाचं विधान केलं होतं.

राहुल गांधींच्या या विधानाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भातील सुनावणीदरम्यान राहुल गांधींना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. हे समन्स व दाखल करण्यात आलेली तक्रार याविरोधात राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्यावर करण्यात आलेले आरोप व दाखल तक्रार ही चुकीच्या हेतूने करण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. मात्र, २९ मे रोजी न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळून लावली होती.