वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथील मॅनहॅटन न्यायालयात शरणागती पत्करली आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास ते शहरातील ‘ट्रम्प टॉवर’ या आपल्या निवासस्थानातून न्यायालयात दाखल झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा त्यांना अटक झाली असून गुन्हेगारी प्रकरणात अशी कारवाई होणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या वकिलांमार्फत ‘पॉर्न स्टार’ स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तब्बल १ लाख ३० हजार डॉलर दिले होते. ही रक्कम त्यांनी आपल्या निवडणूक खर्चात दाखविली नाही, तसेच एका कंपनीच्या खात्यातून हे पैसे वळते केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प न्यायालयामध्ये निर्दोष असल्याचा दावा करणार असून आरोपांना आव्हान देणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर ट्रम्प यांच्याविरोधातील आरोपांचे वाचन करण्यात आले. तांत्रिकदृष्टय़ा अटक केल्यानंतर त्यांची छायाचित्रे, बोटांचे ठसे आदी प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.