अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता या प्रकरणावरुन राजकारणही चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी विरुद्ध भाजपा असा संघर्ष या प्रकरणावरुन सुरु असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने या प्रकरणावरुन जातीचा मुद्दा पकडून भाजपावर टीका केली आहे. भाजपाला ब्राह्मणांशी काय अडचण आहे असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी उपस्थित करत रिया चक्रवर्तीची बाजू घेतली आहे.

सामजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये रिया ब्राह्मण असल्याचे तिला भाजपाच्या लोकांकडून अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. “ब्राह्मणविरोधात भाजपाला एवढा द्वेष का आहे? एका समान्य बंगाली ब्राह्मण कुटुंबातील मुलगी असणाऱ्या रिया चक्रवर्तीचा दोष काय आहे? ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेणं गुन्हा आहे का?, भाजपा त्यांच्या संपूर्ण ट्रोल आर्मीसहीत प्रसारमाध्यमांच्या मदतीने ब्राह्मणांना टार्गेट करत आहे. दोष सिद्ध होण्याआधीच ब्राह्मणांंना फासावर लटकवा,” असं सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसारखा ब्राह्मण मुख्यमंत्री नको असल्याचेही सिंह यांनी म्हटलं आहे. “भारतामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी या एकमेवर अशा बंगाली ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत ज्यांना भाजपा सत्तेवरुन हटवू पाहत आहे,” असं ट्विट सिंह यांनी केलं आहे.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ शहरामध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती.  पोस्टर्समध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे ब्राह्मणांचे रक्षक असल्याचे म्हटले आहे. हे पोस्टर हजरतगंज परिसरातील दारुल शफामधील आमदार निवासाच्या भिंतीवर लावण्यात आलं होतं. पोस्टरमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना परशुने ब्राह्मणांवर वार करताना दाखवलं होतं. योगींबरोबरच या पोस्टवर केशव प्रसाद मौर्य आणि भाजपाच्या इतर नेत्यांचेही फोटो होते. ‘बेटी बचाओ भाजपा भगाओ, बंद करो ब्राह्मणों पर अत्याचार, ना भ्रष्टाचार ना गुंडाराज अबकी बार अखिलेश सरकार’ अशा घोषणाही या पोस्टवर लिहिण्यात आल्या होत्या.. या पोस्टवर डॉक्टर आणि करोना रुग्णाचे प्रतिनिधिक फोटो दाखवण्यात आला आहे. त्याखाली ‘करोना साथीच्या नावाखील पैसे उकळले जात आहेत’ असा मजकूर लिहिला होता.  समाजवादी पक्षाच्या छात्र सभेचे प्रदेश सचिव विकास यादव यांनी हे पोस्टर लावल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.