एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बिहारमधील लखीसराय या ठिकाणी झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५ जण हे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ हा अपघात घडला. आज (१६ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.. भरधाव ट्रकने सुमोच्या गाडीला दिलेल्या भीषण धडकेमुळे हा अपघात घडला. यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण हे गंभीर जखमी झाले. दरम्यान सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त सुमोमध्ये जवळपास १० जण होते. जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सगदहा भंडारा गावात गेले होते. त्या ठिकाणी राहणारे लालजीत सिंग यांची पत्नी गीता देवी यांच्या अंत्यसंस्काराला यांनी उपस्थिती लावली. या अंत्यसंस्काराहून परतत असताना सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या सुमो गाडी आणि ट्रकमध्ये धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सुमोचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला. यात ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकीचे चार जण जखमी झाले. दरम्यान या ट्रकमध्ये एलपीजी गॅस ठेवण्यात आले होते.

कुटुंबावर शोककळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात गीता देवी यांचे पती लालजीत सिंग, मोठा मुलगा अमित शेखर उर्फ ​​नेमानी सिंग, लहान मुलगा रामचंद्र सिंग, मुलगी बेवी देवी, भाची अनिता देवी आणि चालक प्रीतम कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ६ जणांपैकी लालजित सिंग हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मेहुण्याचा मेहुणा होता. सुशांत सिंग राजपूतचा मेहुणा ओमप्रकाश सिंग हा हरियाणातील पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत आहे. ओमप्रकाश सिंग यांची बहीण गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर हे सर्वजण परतत असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर कुटुंबासह गावातही शोककळा पसरली आहे.