सध्या युद्धाने ग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानचे समर्थ, स्वतंत्र आणि समृद्ध देशात रूपांतर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अफगाणी नागरिकांना भारतातर्फे सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले. पुनर्उभारणीचे कार्य, संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उभयपक्षीय सहकार्य वाढीस लागेल, असा विश्वासही स्वराज यांनी व्यक्त केला.
भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी काबूल येथे भारताच्या नव्या दूतावासाचे उद्घाटन केले. त्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांच्याशी चर्चाही केली. भारत अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदत करू इच्छितो आणि शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढीस लागावे आणि त्याद्वारे नागरिकांची समृद्ध अफगाणिस्तानची मनीषा सिद्धीस जावी अशीच आमचीही इच्छा आहे, असे स्वराज यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षांना सांगितले.
भारतातर्फे अफगाणिस्तानला लोकप्रतिनिधीगृहाची वास्तूही बांधून दिली जात आहे. तसेच, तेथील संरक्षण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, दोन अब्ज डॉलरचा मदतनिधी आणि पुनर्उभारणीचे कार्य यासाठी भारताकडून सहकार्य केले जात आहे. स्वराज यांनी करझाई यांच्यासह झालेल्या चर्चेत सद्य:स्थितीचा आढावा घेतला आणि संरक्षणविषयक आव्हानांना एकत्रितरित्या सामोरे कसे जाता येईल याबाबत चर्चा केली. नाटो फौजा बाहेर पडल्यानंतर उद्भवणाऱ्या सामरिक आव्हानांचा आणि त्यावरील एकत्रित उपाययोजनांचाही या भेटीत ऊहापोह करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
भारत- अफगाणिस्तान संरक्षण क्षेत्रात सहकार्य
सध्या युद्धाने ग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानचे समर्थ, स्वतंत्र आणि समृद्ध देशात रूपांतर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अफगाणी नागरिकांना भारतातर्फे सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले.

First published on: 11-09-2014 at 02:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj hamid karzai agree to intensify security defence ties