मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याच्या सुटकेबद्दल पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघात केलेल्या प्रयत्नांना अडसर घालण्याच्या चीनच्या कृतीचा मुद्दा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे चिनी समपदस्थ वांग यी यांच्याकडे उपस्थित केला. दोन्ही देशांच्या संबंधांमधील प्रगतीतील हा विरोधाभास असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय दात्यांच्या परिषदेनिमित्त भारत व चीनचे परराष्ट्रमंत्री काठमांडूत एकत्र आले होते. लख्वी हा सामान्य दहशतवादी नसून १६६ जणांचे बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण आखणी त्याने केली होती, असे स्वराज यांनी वांग यांना सांगितले.
लख्वीप्रकरणी चीनने संयुक्त राष्ट्र संघाच्या १२६७ समितीत जी भूमिका घेतली आहे, तो मुद्दा स्वराज यांनी उपस्थित केला. भारत व चीन हे दोघेही दहशतवादाचे बळी ठरले असल्यामुळे, चांगला दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असा फरक केला जाऊ नये, असे त्यांनी म्हटल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये उत्तम प्रगती होत असताना चीनची या मुद्दय़ावरील भूमिका त्यापासून ढळणारी वाटते, असे त्या म्हणाल्या. त्यावर, चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो आणि आपण या प्रकरणी लक्ष घालू, असे आश्वासन वांग यांनी दिले. दहशतवादविरोधाच्या मुद्दय़ावर भारत आणि चीन यांनी आणखी घनिष्ठ सहकार्य न करू शकण्याचे काहीच कारण नाही, असे वांग म्हणाल्याचेही स्वरूप यांनी सांगितले.
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान गेल्या एप्रिलमध्ये लख्वीची सुटका केल्याबद्दल पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती भारताने संयुक्त राष्ट्र संघाला केली होती. त्यावर विचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या र्निबध समितीची गेल्या आठवडय़ात बैठक झाली, परंतु भारताने या प्रकरणी पुरेशी माहिती पुरवलेली नाही, असे सांगून चीनच्या प्रतिनिधीने या ठरावाला हरकत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या
उच्चपदस्थ नेतृत्वाकडेही हा मुद्दा उपस्थित करून चीनच्या कृतीबाबत भारताची काळजी व्यक्त केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2015 रोजी प्रकाशित
लख्वीप्रकरणी स्वराज यांची चिनी परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याच्या सुटकेबद्दल पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघात

First published on: 26-06-2015 at 03:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj meets chinese counterpart and raises lakhvi issue