AIADMKच्या निलंबित नेत्या शशिकला यांची तुरुंगातून सुटका

चार वर्षानंतर झाली तुरुंगातून सुटका

चेन्नई : व्ही. के. शशिकला यांची चार वर्षानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली.

भ्रष्टाचारप्रकरणी अण्णा द्रमुक या पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या व्ही. के. शशिकला यांची शिक्षा पूर्ण झाल्याने चार वर्षानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका झाली. करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून बाहेर शशिकला यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली तसेच मिठाईचे वाटपही करण्यात आले.

बंगळुरु मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, शशिकला यांची सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुटका करण्यात आली. त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात २१ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. शशिकला यांचे वकील राजा सेंथूर पंडियन यांनी सांगितलं की, सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. त्यांना आता सर्व कायदेशीर प्रकरणातून मुक्त करण्यात आलं आहे. मात्र, सध्या त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात राहणार आहेत.

शशिकला यांची अशा वेळी सुटका झाली आहे जेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी मरीना बीचवर ७९ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या जयललिता यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. शशिकला या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जातात. मिळकतीपेक्षा अधिक ६६ कोटी रुपयांची संपत्ती आढळून आल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना पारापन्ना अग्रहारा येथील केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suspended aiadmk leader shashikala released from jail on corruption charges aau