दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयात स्वामी चैतन्यानंदला हजर करण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की चैतन्यानंदवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. संस्थेच्या १७ विद्यार्थिनींनी हे आरोप केले आहेत. या मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. त्याद्वारे हा बाबा रोज त्या मुलींना अंघोळ करताना बघायचा असंही पोलिसांनी सांगितलं.

चैतन्यानंदला पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये लावण्यात आलेले कॅमेरे हे चैतन्यानंदच्या मोबाइलशी जोडलेले होते. मुली बाथरुममध्ये अंघोळीसाठी गेल्या की चैतन्यानंद त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आणि त्यांना ते व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत आपल्या जाळ्यात ओढायचा. या सगळ्या कटात त्याचे सहकारीही होते. या बाबाने सगळ्या संस्थेवर कब्जा केला होता. त्याने त्याच्या मर्जीतल्या लोकांना तिथे नियुक्त केलं होतं. कोर्टाने स्वामी चैतन्यानंदला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडलं आहे. पोलिसांनी जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी पोलिसांनी हे कारण दिलं की आरोपी दोन महिन्यांपासून फरार होता. त्याने फक्त पुराव्यांशी छेडछाड केली नाही तर तक्रारकर्त्या मुलींनाही धमक्या दिल्या. पोलिसांचं म्हणणं आहे की तपासासाठी त्याला दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा सह इतर ठिकाणी घेऊन जाणं आवश्यक आहे.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला काय सांगितलं?

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की १७ मुलींचा जबाब आधीच नोंदवण्यात आला आहे. आरोपी कुठल्याही पीडितेच्या संपर्कात नाही. आरोपीचं कुठल्याही संपत्तीवर नियंत्रण नाही. अशात पोलीस त्याच्याकडून काय मिळवू इच्छितात? त्याला आता ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नाही असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. तसंच हेदेखील सांगितलं स्वामी चैतन्यानंदला मधुमेह आहे. त्याला त्याची औषधं घेण्यास मज्जाव केला जातो आहे. तसंच तो ज्येष्ठ नागरिक आहे. तो साधू असूनही त्याचे कपडे उतरवण्यात आले. त्याला साधना करण्यापासून रोखलं जातं आहे असाही युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. मात्र यावर दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आलं की आरोपीने डिजिटल डेटा मोठ्या प्रमाणावर डिलीट केला आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं नुसती ताब्यात घेऊन काही अर्थ नाही.

पोलिसांनी आणखी काय सांगितलं?

पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पासवर्ड सारख्या महत्त्वाच्या गोष्टी त्याची चौकशी करुनच आम्हाला मिळतील. डिजिटल संदेश आणि डेटा डिलिशन सारखे प्रकार त्याने केले आहेत त्यामुळे त्याचा ताबा जास्त दिवस मिळावा. दरम्यान यावर बचाव पक्षाने सांगितलं की पोलिसांकडे ४० सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज आहे. त्यातून ते पुरावे शोधू शकतात.

यानंतर पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की स्वामी चैतन्यानंदने लेडिज हॉस्टेलच्या बाथरुममध्ये कॅमेरे लावले होते. त्या कॅमेरांचं कनेक्शन या बाबाच्या मोबाइलशी जोडलं गेलं होतं. तो कॅमेरांद्वारे मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा, त्यांचा लैंगिक छळ करायचा. आता पोलीस पाच दिवसांच्या कोठडीत आणखी काय काय चौकशी करतात आणि या बाबाचं काय सत्य समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.