शंकराचार्यांनीच पत्रकाराच्या श्रीमुखात भडकावल्याची धक्कादायक घटना घडली. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून प्रश्न विचारल्यावर रागाचा पारा चढल्याने द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी कोणतेही उत्तर न देता थेट समोरील पत्रकाराच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे. ही घटना नेमकी कधी घडली, हे स्पष्ट झालेले नाही.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर… असा प्रश्न संबंधित पत्रकाराने विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्याऐवजी शंकराचार्यांनी पत्रकाराच्या श्रीमुखात लगावली. फालतू गोष्टी करू नका, मला राजकारणावर काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी या घटनेनंतर पत्रकारांना सांगितले.
या संदर्भात शंकराचार्यांचे शिष्य म्हणाले, प्रश्न विचारणारा पत्रकार शंकराचार्यांच्या खूप जवळ आला होता. त्यामुळे शंकराचार्यांनी फक्त त्याला दूर केले. डॉक्टरांनी शंकराचार्यांना लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असल्याचे शिष्याने सांगितले.