Sydney man ऑस्ट्रेलियातल्या सिडनी या ठिकाणी खाटकाची जागा भरायची असून त्यासाठी १४० अर्ज आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सगळे अर्ज भारत आणि पाकिस्तानातून आले आहेत. या नोकरीसाठी वार्षिक पगार १ लाख ३० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर इतका पगार आहे. भारतीय रुपयांनुसार ७३ लाख रुपये वार्षिक पगार असणार आहे. news.com.au या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार खाटकाच्या नोकरीसाठी १४० अर्ज आले आहेत.
आलेक्झान्ड्रिया क्लोव्हर मिट कंपनीची जाहिरात
सिडनीतल्या आलेक्झान्ड्रिया क्लोव्हर मिट कंपनीने ही जाहिरात दिली होती. त्यांनी म्हटलं आहे पैसे हा विषय नाही. आम्हाला ऑस्ट्रेलियातल्या एकाही माणसाने अर्ज केला नाही याचं आश्चर्य वाटल्याचं कंपनीने म्हटलं आहे. आमच्याकडे १४० अर्ज आले आहेत त्यापैकी बरेच अर्ज हे भारत आणि पाकिस्तानातले आहेत स्थानिक अर्ज एकही नाही असं कंपनीने म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. भारत, पाकिस्तान, नायजेरिया, दक्षिण अमेरिका, बांगलादेश या देशांमधून आम्हाला अर्ज आले आहेत असं कंपनीने म्हटलं आहे. इथे नोकरीसाठी बाहेच्या देशांमधले लोक येऊ पाहात आहेत. त्यापैकी काहींना तर इंग्रजीही नीट येत नाही. तर अनेकांना खाटिक व्यवसायाचं नीटसं ज्ञानही नाही. काही जणांनी हलाल खाटिकखान्यात काम केलं आहे, तेवढाच अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. १४० जणांपैकी अनेकांना इंग्रजी भाषा बोलता येत नाही असंही कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जी जागा भरायची आहे त्यासाठी अडचणीच येत आहेत असंही या व्यावसायिकाने म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे इथल्या व्यावसायिकांनी?
ऑस्ट्रेलियाच्या व्यावसायिकाने हे म्हटलं आहे की जे अर्ज आले आहेत त्यांच्यापैकी अनेकांना स्पॉन्सरशिपही हवी आहे. काही वर्षांपूर्वी शेफ इंडस्ट्रीतही असंच घडलं होतं. अनेकांनी शेफ म्हणून ऑस्ट्रेलियात प्रवेश केला. आत्ताच्या घडीला अशी स्थिती आहे की स्थानिक खाटिक या पदासाठी अर्ज करायला तयार नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांनाच इथे हे काम करण्यासाठी आणावं लागतं आहे. विशेष बाब म्हणजे बाहेरुन आलेल्या लोकांना शिकवण्यासाठीही इथे कुणी नाही. खाटिक काम करण्यात कौशल्य असलेल्या लोकांची कमतरता आहे असंही या सगळ्या बिझनेस लॉबीला वाटतं आहेच. डॅनियल हंटर यांनी तशी खंतही बोलून दाखवली.