scorecardresearch

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्यातरी अमेरिकेतच राहणार; प्रत्यार्पणावरील पुढील सुनावणी १५ जुलैला

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. लॉस एंजिल्समधील न्यायालयाने याबाबत स्पष्ट केलं आहे

Tahawwur Rana Terrorist1
२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्यातरी अमेरिकेतच राहणार; प्रत्यार्पणावरील पुढील सुनावणी १५ जुलैला (Photo- Indian Express)

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. पुढील सुनावणीपर्यंत हा निर्णय असेल असं लॉस एंजिल्समधील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. राणाचा २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्नशील आहे. यासाठी लॉस एंजिल्सच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला सुरु आहे. याप्रकरणी न्यायालयाने १५ जुलैपर्यंत अतिरिक्त दस्ताऐवज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राणा लष्कर-ए-तोयब्बाचा दहशतवादी डेविड कोलमॅन हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. भारताला तहव्वुर विरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर त्याच्या अटकेसाठी अमेरिकेवर दबाव टाकण्यात आला होता. भारताने ऑगस्ट २०१८ मध्ये त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर १० जून २०२० रोजी त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानी वंशाचा ६० वर्षीय अमेरिकन नागरिक हेडली २००८ मध्ये मुंबई केलेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी होता. या प्रकरणात तो साक्षीदार झाला आणि अमेरिकेत ३५ वर्षांचा तुरुंगवास भोगत आहे. “हेडली आणि राणा पाकिस्तानमधील लष्करी शाळेत एकत्र शिकत होते. राणाचं शिकागो येथील इमिग्रेशन लॉ सेंटर आणि मुंबईतील उपग्रह कार्यालय २००६ आणि २००८ मधील दहशतवादी कारवायांसाठी वापरलं होतं.”, असं कोर्टात वकीलांकडून सांगण्यात आलं. तर दुसरीकडे राणाच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “राणाला हेडलीच्या दहशतवादी कारवायांबाबत काहीही माहिती नव्हतं. बालपणीचा मित्र असल्याने तो त्याला मदत करत होता. हेडली हा खोटारडा आहे. त्याने अमेरिकन सरकारची कित्येक वेळा दिशाभूल केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.” असं राणाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचं ‘खेला होई’!; विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी

तहव्वुर राणाने भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार सध्या राणाला भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारताने प्रत्यार्पणसाठी आवश्यक सर्व बाबींची पुर्तता केली आहे. भारताने सादर केलेले पुरावे सक्षम आहेत. मुंबई हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-06-2021 at 15:52 IST

संबंधित बातम्या