scorecardresearch

तालिबान्यांकडून महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद; मुंडकं आणि रक्तबंबाळ मानेचा फोटो व्हायरल

महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली

तालिबान्यांकडून महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद; मुंडकं आणि रक्तबंबाळ मानेचा फोटो व्हायरल
महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली (Photo: Twitter/Persian Independent)

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबील संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद केला आहे. संघाच्या प्रशिक्षकाने Persian Independent शी बोलताना ही माहिती दिली आहे. प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यामुळे हत्येची माहिती समोर आली नव्हती.

अफगाणिस्तानात सत्तांतर होऊन तालिबान्यांची सत्ता येण्याआधी महजबीन काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबसाठी खेळत होती. महजबीन संघाच्या स्टार खेळाडूंपैकी एक होती. काही दिवसांपूर्वी शिरच्छेद केलेल्या महजबीनच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये तिचं मुंडकं आणि रक्तबंबाळ मान दिसत होती.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात तालिबानने देशातील सत्ता हातात घेण्याआधी फक्त दोनच खेळाडू देशातून पलायन करु शकले. मागे राहिल्या अनेक दुर्दैवी खेळाडूंमध्ये महजबीनचा समावेश होता.

“व्हॉलीबॉल संघाच्या सर्व खेळाडू आणि इतर महिला खेळाडू सध्या वाईट परिस्थितीत असून भीतीच्या वातावरणात आहेत,” असं त्यांनी सांगितलं आहे. प्रत्येकाला पळून जाण्यास आणि भूमिगत राहण्यास भाग पाडण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“सत्ता मिळवल्यापासून तालिबानी महिला खेळाडूंची ओळख पटवत त्यांची हत्या करत आहेत. दहशतवादी खासकरुन महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूंचा शोध घेत आहेत, ज्यांनी देशातील आणि विदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. तसंच काही मीडिया कार्यक्रांमध्येही सहभागी झाल्या होत्या,” असा दावा प्रशिक्षकांनी केला आहे.

१९७८ मध्ये अफगाणिस्तानने महिला व्हॉलीबॉल टीम तयार केली आहे. देशातील अनेक तरुणींसाठी त्या आशेचा किरण आणि प्रेरणा होत्या. मात्र महजबीनच्या हत्येमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी इतर देशांच्या संघटनांची मदत मिळण्यात अद्याप खेळाडूंना यश आलेलं नाही.

गेल्या आठवड्यात फिफा आणि कतार सरकारने अफगाणिस्तानमधून १०० महिला फुटबॉल खेळाडूंना बाहेर काढलं. यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सदस्यही होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-10-2021 at 15:48 IST

संबंधित बातम्या