Afghan Foreign Minister Muttaqi meet S Jaishankar : अफगाणिस्तानच्या तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तालिबानने २०२१ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर भारत आणि तालिबान राजवट यांच्यात झालेली ही पहिलीच उच्च-स्तरीय राजनैतिक चर्चा आहे. भारताबद्दल अफगाणिस्तानची भूमिका मांडताना मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान कोणत्याही गटाला दुसऱ्या एखाद्या देशाविरोधात त्यांची जमीन वापरू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तानचे मंत्री काय म्हणाले?
“अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात, भारत हा पहिला मदत करणारा देश होता. अफगाणिस्तान भारताकडे एक जवळचा मित्र म्हणून पाहतो. आम्हाला परस्पर आदर, व्यापार आणि लोका-लोकांमधील नात्यांवर आधारित संबध हवे आहेत. आपले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सल्लागार विषयक यंत्रणा उभी करण्यासाठी तयार आहोत,” असे मुत्ताकी त्यांच्या बैठकीदरम्यान म्हणाले.
“मी दिल्लीत येण्याबद्दल आनंदी आहे, आणि या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सामंजस्य वाढेल. भारत आणि अफगाणिस्तानने आपले प्रतिबद्धता आणि देवाणघेवाण वाढवावी… आम्ही कोणत्याही गटाला आमच्या भूभागाचा वापर इतरांविरुद्ध करू देणार नाही,” असेही मुत्ताकी यांनी स्पष्ट केले.
यून सेक्युरिटी काउन्सिल कमिटीकडून तात्पुरती प्रवासाची सूट मिळाल्यानंतर तालिबान नेते मुत्ताकी हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. कारण संयुक्त राष्ट्राने त्यांच्या बंधने घातलेली आहेत, ज्यामध्ये प्रवासावरील बंदी आणि मालमत्ता जप्तीचा समावेश आहे.
लवकरच काबूलमध्ये दूतावास
या बैठकीदरम्यान एस. जयशंकर यांनी घोषणा केली की भारत हा आपले दूतावास अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सुरू करतील, हा दूतावास गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. यामुळे तालिबानच्या राजवटीखालील देशाशी संबंध आणखी विस्तारीत होतील.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोचे सैन्य २०२१ मध्ये परत बोलवल्यानंतर तालिबानने आफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतली, यानंतर भारातने तेथील दूतावास बंद केला होता. पण व्यापार, मेडिकल सपोर्ट आणि मानवतावादी मदत सुरू ठेवण्यासाठी दुसऱ्याच वर्षी एक लहान मिशन उघडण्यात आले होते. चीन, रशिया, इराण, पाकिस्तान आणि तुर्किये यांच्यासह जवळपास डझनभर देशांचे काबूल येथे दुतावास आहेत.