अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याने सध्या जगभरात खळबळ माजली आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या, राजदूतांच्या सुरक्षेसाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. मात्र, आता तालिबान्यांनी त्याचा मोर्चा अफगाणिस्तानाच्या उर्वरित भागांकडे वळवला आहे. असे भाग जे अद्याप तालिबानच्या ताब्यात नाहीत.
अफगाणिस्तानातले जे भाग अद्याप तालिबान्यांच्या ताब्यात नाहीत, त्यापैकी एक म्हणजे पंजशीर. या भागाकडे आता शेकडो तालिबान्यांनी कूच केली असल्याची माहिती रविवारी तालिबानकडून देण्यात आली. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर सरकारमधील अनेक नेते, अधिकारी, तालिबानविरोधी नागरिकांनी पंजशीरकडे धाव घेतली. काबूलच्या उत्तरेला असणारा हा भाग तालिबान विरोधी म्हणून ओळखला जातो.
राज्यातल्या स्थानिक प्रतिनिधींनी शांततेत या भागाचा ताबा आमच्याकडे दिला नाही त्यामुळे शेकडो मुजाहिदीन आता पंजशीरचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती तालिबान्यांनी आपल्या अरबी ट्विटर अकाऊंटवरुन दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. तालिबानने देश ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा पंजशीरकडे वळवला होता.
पंजशीरमध्ये ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याच्या दोन दिवस आधी अल-कायदाने हत्या केलेल्या मुजाहिदीन कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सुमारे ९,००० लोकांची फौज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती प्रवक्ते अली मैसम नाझरी यांनी दिली आहे.