पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि बिलावल भुत्तो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीदरम्यान (पीपीपी) रविवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली अशी माहिती तेथील माध्यमांनी रविवारी दिली. ‘पीएमएल-एन’ आणि ‘पीपीपी’दरम्यान सरकार स्थापनेचा निर्णय झालेला आहे, मात्र सत्तावाटपाची चर्चा कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकली नाही.

दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची जबाबदारी संपर्क व समन्वय समितीवर असून शनिवारी त्यांच्यामध्ये तिसऱ्यांदा बोलणी झाली. आता सोमवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. ‘पीएमएल-एन’ने ७५ तर ‘पीपीपी’ने ५४ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधानपद शाहबाज शरीफ यांच्याकडे राहणार आहे. बिलावल यांनी पूर्वीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. 

हेही वाचा >>>भारतीय अन्न महामंडळाचे भागभांडवल २१ हजार कोटींवर, केंद्र सरकारचा निर्णय; कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये कथित गैरप्रकार केल्या प्रकरणी पाकिस्तान निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सिकंदर सुलतान राजा आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काझी फैज इसा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने केली आहे. या दोघांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत रावळिपडीचे आयुक्त लियाकत अली चठ्ठा यांनी अलिकडेच राजीनामा दिला आहे.