Tamannaah Bhatia to be Brand Ambassador for KSDL: गेल्या काही दिवसांत कर्नाटकमध्ये भाषेवरून झालेल्या वादाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एकीकडे कन्नडमध्ये बोलण्यास नकार देणाऱ्या एसबीआय ब्रँचमधील महिला पदाधिकाऱ्याची बदली झाली, तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये हिंदी बोलल्यावरून पार्किंग नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. मातृभाषेचा आग्रह आणि प्रादेशिक अस्मिता या गोष्टींवर नव्याने चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियावर सरकारने सोपवलेल्या एका जबाबदारीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकच्या प्रसिद्ध मैसूर सँडल साबणाचं उत्पादन कर्नाटक सोप्स अँड डिटर्जेंट लिमिटेड अर्थात KSDL कडून केलं जातं. मैसूर सँडल साबणासह केएसडीएलच्या इतर उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी कर्नाटक सरकारने बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली. इतकंच नव्हे, तर तमन्ना भाटियाशी दोन वर्षं दोन दिवस कालावधीसाठी तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांचा करारदेखील कर्नाटक सरकारने केला आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे मैसूर सँडल साबण आणि केएसडीएलच्या इतर उत्पादनांच्या मार्केटिंगला मोठा फायदा होणार असला, तरी त्यामुळे कर्नाटक सरकारला मात्र टीकेचं धनी व्हावं लागत आहे. कर्नाटकमधील अभिनेत्रींशी सरकारनं करार का केला नाही? अशी विचारणा आता कर्नाटक सरकारला केली जाऊ लागली आहे.
नेटिझन्समध्ये संताप, हिंदी कलाकारांना विरोध
दरम्यान, कर्नाटक सरकारने कन्नड अभिनेत्री असूनही बॉलिवुडमधल्या हिंदी अभिनेत्रीला ब्रँड अॅम्बेसिडर का केलं? असा सवाल केला जात आहे. “आशिका रंगनाथनसारख्या उत्तम दर्जाच्या कन्नड अभिनेत्रींना ब्रँड अॅम्बेसिडर करता आलं असतं. पण तरीही हिंदी अभिनेत्रींना नियुक्त करून त्यांना प्रसिद्धी का द्यावी?” असा सवाल एका युजरनं उपस्थित केला आहे. अशाच प्रकारच्या इतरही अनेक प्रतिक्रियांमधून कर्नाटक सरकारला लक्ष्य केलं जात आहे.
कर्नाटक सरकारची भूमिका काय?
दरम्यान, कर्नाटक सरकारनं या टीकेनंतर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “तमन्ना भाटियाला केएसडीएलची ब्रँड अॅम्बेसिडर करण्याचा निर्णय बऱ्याच चर्चेअंती घेण्यात आला आहे. कर्नाटकच्या पलीकडेही बाजारपेठ असून तिथे आक्रमकपणे आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं”, अशी माहिती कर्नाटकचे वाणिज्य व उज्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी माध्यमांना दिली.
“कर्नाटक चित्रपटसृष्टीबाबत केएसडीएलला पूर्ण आदर आहे काही कन्नड चित्रपट तर थेट बॉलिवुड चित्रपटांशीही स्पर्धा करतात. मैसूर सँडल साबण हा ब्रँड आता कर्नाटकमध्ये घराघरात पोहोचला आहे. कर्नाटकमधील या साबणाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. पण आता मैसूर सँडल साबणाला कर्नाटकच्या बाहेरच्या बाजारपेठांमध्येही प्रसिद्धी द्यायला हवी. त्यामुळे अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं पाटील म्हणाले.
ब्रँड अॅम्बेसिडर निवडण्यासाठी कोणते निकष?
दरम्यान, तमन्ना भाटियाची निवड करण्यासाठी अनेक निकषांचा विचार करण्यात आल्याचं पाटील म्हणाले. “कोणत्याही उत्पादनासाठी ब्रँड अॅम्बेसिडर निवडण्यासाठी बरीच चर्चा आणि निकषांचा विचार करावा लागतो. त्यात संबंधित कलाकाराने अशाच प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या उत्पादनाची जाहिरात केलेली नसावी, समाजमाध्यमांमध्ये त्या कलाकाराचा प्रभाव, उत्पादनाशी साधलं जाऊ शकणारं साधर्म्य, प्रत्यक्ष उत्पादन आणि ज्या ग्राहकांसाठी ते उत्पादन आहे त्या ग्राहकांच्या आवडी-निवडी अशा बाबींची चाचपणी करावी लागते”, अशी माहिती पाटील यांनी दिली.