तमिळनाडूच्या तंजावरमध्ये जबरदस्तीने धर्मांतर केल्यामुळे एका मुलीनं विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ९ जानेवारी रोजी ही मुलगी विष प्यायली होती. त्यानंतर १० दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तामिळनाडूचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आता या मृत मुलीचा आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने तिला वसतिगृहात काम करण्यास भाग पाडलं गेलं आणि अभ्यास करू दिला नाही, अशी तक्रार केल्यामुळे तिच्या शाळेने जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे.
व्हिडीओमध्ये तरुणीचा आरोप आहे की, वॉर्डनने तिला हिशेब करायला लावले, हॉस्टेलचे गेट बंद आणि उघडण्यास आणि मोटर चालू, बंद करायला लावली. तर तिला शाळेत बिंदी घालण्यापासून रोखले आहे का, असे विचारले असता, मुलीने असे काही घडले नसल्याचे उत्तर दिले. व्हिडीओत मुलीने सांगितलं की तिला दहावीत प्रथम क्रमांक मिळाला असून तिला चांगला अभ्यास करायचा आहे. परंतु तिच्यावर सोपवलेल्या कामामुळे तिला नीट अभ्यास करता येत नसल्याचा आरोप तिने केला. कौटुंबिक समस्यांमुळे तिने या वर्षी उशिरा शाळेत प्रवेश घेतला, असं ती व्हिडीओत सांगते.




ती म्हणाली, “वसतिगृहातील दीदी मला नेहमी हिशेब करायला सांगते. मी तिला सांगितले की मी उशिरा जॉईन झाले त्यामुळे मी ते नंतर करेन. पण तिने ऐकलेच नाही. ती म्हणाली हे काम संपवून मग इतर कामं कर. जरी मी ते नीट केले तरी ती चूक म्हणायची आणि मला ते पुन्हा लिहायला लावायची. यामुळे, मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकली नाही आणि कमी गुण मिळाले. मला ते सहन होत नव्हते म्हणून मी विष प्यायले.”
“मी आजारी असल्याने शाळेने मला घरी जाऊ दिले, मी विष प्राशन केले, हे त्यांना माहित नव्हते. वॉर्डनचे नाव समाया मेरी असल्याचे तिने उघड केले. तसेच मला पोंगलसाठी घरी जायचे होते, परंतु अभ्यासाचं कारण देत मला जाण्यासाठी परवानगी न देता हॉस्टेवर थांबायला लावलं,” असा आरोप तिने केला.
व्हिडीओ काढणाऱ्याची चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश..
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने सोमवारी एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यूच्या काही दिवस आधी जबरदस्तीने धर्मांतर करण्याबाबत बोलत असलेल्या व्हिडीओचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आणि त्याने शूट करण्यासाठी वापरलेला फोन जमा करण्याचे आदेश दिले. या घटनेची सीबी-सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
शाळेने आरोप फेटाळले…
दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या कोणत्याही धार्मिक श्रद्धांमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. उपेक्षित आणि जे शिक्षणापासून वंचित आहेत, अशा मुलांना शिक्षण देण्याच्या एकमेव उद्देशाने ते १८० वर्षांपासून ही संस्था चालवत आहेत, असे व्यवस्थापनाने सांगितले. तसेच शाळेने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.