Tamilnadu CM M. K. Stalin Urges Immediate Childbirth To Counter Impact : सीमांकन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील वादादरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी सोमवारी नागरिकांसाठी एक विचित्र आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील नागरिकांना तत्काळ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. लोकसंख्या आधारित सीमांकनामुळे संसदेत तामिळनाडूचे सदस्य कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नागाई जिल्ह्यातील सचिवाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले, “पूर्वी आम्ही म्हणायचो की वेळ घ्या आणि मग मुलांना जन्माला घाला. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता तत्काळ मुलांना जन्माला घाला असं म्हणावं लागेल. आपण कुटुंब नियोजन योजन यशस्वीरित्या राज्यात राबवली. पण त्याचा परिणाम आता आपल्याला भोगावा लागतोय.”

सीमांकनाच्या मुद्द्यांवरून सर्वपक्षीय बैठक

सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, स्टॅलिन यांनी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तामिळनाडूच्या भविष्याचा विचार करावा अशी इच्छा व्यक्त केली. विरोधी पक्षांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “मी त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करतो. कृपया अहंकार बाजूला ठेवा. तुम्ही माझे आवाहन का ऐकावे याचा विचार करू नका”, असं स्टॅलिन म्हणाले. तामिळनाडूसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यावरही त्यांनी भर दिला.

स्टॅलिन यांनी घोषणा केली होती की निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत ४० राजकीय पक्षांना मतदारसंघांच्या सीमांकनाच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे. ज्याचे वर्णन त्यांनी “तामिळनाडूवर लटकणारी तलवार” असे केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना स्टॅलिन यांनी अधोरेखित केले होते की तामिळनाडूने कुटुंब नियोजन धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आता राज्याचे नुकसान झाले आहे. “जर लोकसंख्या जनगणनेच्या आधारे सीमांकन लागू केले गेले तर तामिळनाडूतून आठ खासदार कमी होतील. यामुळे तमिळनाडू संसदेत प्रतिनिधित्व गमावेल”, असे त्यांनी म्हटले होते.