भारताने पाठवलेलं चांद्रयान-३ हे अंतराळयान बुधवारी (२४ ऑगस्ट) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोने चंद्रावर आपलं यान उतरवून भारताला एलिट स्पेस क्लबमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. या कामगिरीमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. युनायटेड स्टेट्स, चीन आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनने चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. त्यापाठोपाठ भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला असून यासाठी आपल्याला इस्रोच्या वैज्ञानिकांचे आभार मानायला हवेत. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी मेहनत घेतली त्यात एक मराठमोळी महिला संशोधक आहे.

तिकडे चंद्रावर चांद्रयान ३ उतरलं आणि पुण्यातले प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे यांच्या घरात एकच जल्लोष झाला कारण राजस देशपांडे यांची धाकटी बहीण इस्रोच्या चांद्रमोहिमेचा महत्त्वाचा भाग होती. डॉ. देशपांडे यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. ते म्हणाले, “माझी एकुलती एक बहीण, जी माझ्यापेक्षा लहान आहे, तिचं या चांद्रमोहिमेत मोठं योगदान आहे.” तनुजा पत्की असं त्यांच्या बहिणीचं नाव असून त्या पूर्वी पुण्यातील प्रसिद्ध कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन या महाविद्यालयात लेक्चरर होत्या. परंतु, आता त्या बंगळुरूमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये काम करत आहेत. विक्रम लँडरच्या लँडिंग टीमचा त्या महत्त्वाचा भाग आहेत.

डॉ. राजस देशपांडे म्हणाले, तनुने(तनुजा पत्की) तिच्या कारकिर्दीत खूप मोठा टप्पा गाठला आहे, तिला अजून खूप पुढे जायचंआहे. यावेळी डॉ. देशपांडे यांनी त्यांचं आणि बहीण तनुजाच्या नांदेडमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, तिला लहानपणापासून विज्ञान या विषयाची खूप आवड होती आणि तिला चंद्राचं विलक्षण आकर्षण आहे.

डॉ. देशपांडे म्हणाले, तनू एक स्वप्नाळू शास्त्रज्ञ आहे, ती शाळेत असल्यापासूनच वेगवेगळ्या कल्पनांमध्ये रमायची. तिच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. ती आता तिच्या कल्पना सत्यात उतरवतेय. आज तिचं हे यश पाहण्यासाठी आमचे आई-बाबा असायला हवे होते. माझे बाबा म्हणायचे, “बघ, तनू एक दिवस भारताला अभिमान वाटेल असं काहीतरी करेल.”

हे ही वाचा >> “दरवाजा उघडलाय, आता…”, कॅनेडियन अंतराळवीराचं Chandrayaan 3 बद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, “भारतीय लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेडमध्ये शिक्षण, पुण्यात पहिली नोकरी ते १८ वर्ष इस्रोमध्ये संशोधन

तनुजा पत्की यांनी नांदेडमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. त्यानंतर इन्स्ट्रूमेंटेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स महाविद्यालयात १९९७ ते २००० पर्यंत तीन वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी काही वर्ष डिझाईन इंजिनियर आणि इतर काही ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं. १८ वर्षांपूर्वी तनुजा पत्की या इस्रोमध्ये रुजू झाल्या. गेल्या १८ वर्षांपासून त्या इस्रोमध्ये काम करत आहेत.