देशातील नामांकित टाटा समूहाची कंपनी असणारी टाटा स्टील ही आपल्या सहा उपकंपन्या स्वतःमध्ये विलीन करणार आहे. कंपनीकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिल्याचेही कंपनीच्या वतीने निवेदनात सांगण्यात आले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने टाटा स्टीलमध्ये सहा उपकंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या योजनांचा विचार करून त्याला हिरवा कंदील दर्शवला आहे.

या सहा कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन होणार आहेत –

टाटा स्टीलच्या ज्या उपकंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे त्यामध्ये – ‘टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेड’, ‘द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’, ‘टाटा मेटालिक्स लिमिटेड’, ‘द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड.

विलीन होणार्‍या दोन उपकंपन्या संपूर्णपणे टाटा स्टीलच्या मालकीच्या –

टाटा स्टीलची ‘टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेड’ मध्ये ७४.९१ टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय ‘द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये ७४.९६ टक्के, ‘टाटा मेटॅलिक्स लिमिटेड’मध्ये ६०.०३ टक्के आणि ‘द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड’मध्ये ९५.०१ टक्के, तर ‘टाटा स्टील मायनिंग लिमिटेड’ आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड’ या त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपन्या आहेत.

यासोबतच, कंपनीच्या बोर्डाने टाटा स्टीलची उपकंपनी ‘TRF लिमिटेड’चे देखील (३४.११ टक्के भागीदरी) टाटा स्टील लिमिटेडमध्ये विलीन करण्यासही मान्यता दिली आहे.