टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनाक्रमाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज(सोमवार) यासाठी मंजुरी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा सन्सने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते, त्यानंतर यासाठी अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र, आता या सर्वोच्च पदावरील नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली आहे. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरेदी करण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या. खरंतर ‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. त्यांनी ती सरकारला विकली होती, पण आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे. 

मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

टाटा समूहाने यापूर्वी तुर्कीचे इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी म्हणून घोषणा केली होती, परंतु त्यांच्या नियुक्तीला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. इल्कर आयसी यांनी टाटाच्या एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी होण्यास नकार दिला होता.

चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत, जी १०० हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांची होल्डिंग कंपनी आणि प्रवर्तक आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डामध्ये सहभागी झाले आणि जानेवारी २०१७ मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata sons chief n chandrasekaran appointed chairman of air india msr
First published on: 14-03-2022 at 22:05 IST