Chandan Mishra murder case बिहारची राजधानी पाटणा येथे रुग्णालयात झालेल्या गोळीबाराने सर्वत्र खळबळ उडाली. पाटणातील पारस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैदी चंदन मिश्राची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बिहारचे राजकारणही चांगलेच तापले. पाटण्याच्या प्रतिष्ठित पारस रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच हल्लेखोर रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश करताना दिसले. हल्लेखोरांच्या गटांचे नेतृत्व कॉलर सैल असणारा, हातात बंदूक असलेला एक व्यक्ती करत असल्याचे दिसून आले. त्याची ओळख पटली असून तो तौसीफ बादशाह असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चंदन मिश्रा हत्याकांडात नक्की काय समोर आले?
चंदन मिश्रावर खुनाच्या गुन्ह्यांसह तब्बल २४ गुन्हे दाखल आहेत. तो वैद्यकीय उपचारांसाठी पॅरोलवर होता. त्याला पहारेकऱ्यांसह पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गुरुवारी सकाळी पाच जण रुग्णालयात या घुसले, आयसीयूमच्या दिशेने चालत गेले आणि अंदाधुंद गोळीबार केला. यादरम्यान रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला आणि या गोंधळात हल्लेखोर गायब झाले. या हल्ल्यात चंदन मिश्रा मारला गेला. सकाळी ८ च्या सुमारास हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही तासांतच पोलिसांनी पाचही हल्लेखोरांची ओळख पटवली.
फुटेजमध्ये तौसीफ बादशाह उजव्या हातात पिस्तूल घेऊन पुढे चालत असल्याचे दिसून आले आहे. आयसीयूमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा इतर हल्लेखोर पळून गेले. मात्र, तौसीफ रुग्णालयातून शांततेत बाहेर पडत असल्याचे दिसले. हत्येनंतर, दोन छायाचित्रे समोर आली ज्यात हल्लेखोरांनी त्यांच्या कृत्याचा आनंद साजरा केल्याचे दिसून आले. एका छायाचित्रात, तौसीफ मोटारसायकलवर दोन जणांसह मागे बसून असल्याचे, एक हात हवेत उंचावत पिस्तूल धरलेला दिसला. तर, दुसरा हल्लेखोर दोन्ही हात वर करून विजयोत्सव साजरा करताना दिसला.
तौसीफ बादशाह कोण आहे?
पोलिसांच्या माहितीनुसार, तौसीफ बादशाह हा पाटण्याच्या फुलवारी शरीफचा रहिवासी आहे. त्याचे वडील हार्डवेअरचा व्यवसाय करतात. त्याची आई शिक्षिका आहे. त्याने सेंट करेन शाळेत शिक्षण घेतले. तौसीफविरोधात आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गतदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तौसीफ अलीकडेच कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये सामील झाला होता. त्याने खून करण्यासाठी किंवा अशा कारवायांसाठी रसद पुरवण्यासाठी पैसे घेण्यास सुरुवात केली होती. पोलीस सूत्रांनी माहिती दिली की, ही हत्या चंदन मिश्रा आणि शेरू नावाच्या गुंड यांच्यातील जुन्या शत्रुत्वातून झाली आहे. एकेकाळी मित्र असलेल्या चंदन आणि शेरू यांच्यात भागलपूर तुरुंगात फूट पडली. चंदन वेगळा झाला आणि स्वतंत्रपणे काम करू लागला, मात्र तरीही तो त्याच्या टोळीला ‘शेरू गँग’ असे नाव देत होता.
हत्याकांडाचा राजकीय परिणाम
पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली एका प्रतिष्ठित रुग्णालयात तुरुंगात असलेल्या गुंडाची हत्या झाल्याने बिहारचे राजकारण तापले आहे. आरजेडी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘एक्स’वर लिहीले, “गुन्हेगारांनी पाटण्याच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कैदी रुग्णावर गोळीबार केला. बिहारमध्ये कोणी सुरक्षित आहे का? २००५ पूर्वी, आरजेडीच्या राजवटीत बिहारमध्ये अशी घटना घडली होती का?” पूर्णिया येथील अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी दावा केला की, त्यांना या प्रकरणापासून दूर राहण्यासाठी धमकीचा फोन आला होता.
ते म्हणाले, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यपालांना भेटून मी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करेन. गुन्हेगारांना त्यांच्या जातीच्या आधारे मारले जात आहे,” असा दावा त्यांनी केला. बिहार पोलिसांनी आतापर्यंत पाटणा आणि बक्सर येथून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर, विशेषतः शेरू टोळीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.