TDP MP Kalisetty Appalanaidu promises gifts for women giving birth to third child : दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. यादरम्यान तेलुगु देसम पक्षाच्या (TDP) खासदाराने तिसरे आपत्य जन्माला घालणाऱ्या दाम्पत्यांना वेगळीच ऑफर दिली आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

टीडीपीचे विजयनगरमचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायडू (Kalisetty Appalanaidu) यांनी आंध्र प्रदेशात महिलांना तिसरे अपत्य झाल्यास ५०,००० रुपये किंवा गाय देण्याची ऑफर दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार अप्पलनायडू यांनी घोषणा केली की, जर एखाद्या महिलेने तिसरे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला तर तिला त्यांच्या पगारातून ५०,००० रुपये दिले जातील आणि जर मूल मुलगा असेल तर तिला गाय दिली जाईल.

अप्पलनायडू यांची ही घोषणा सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्यासह टीडीपीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी राज्याची लोकसंख्या कमी होत असून ती वाढवण्याची गरज असल्याबद्दल वक्तव्य केली आहेत.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अप्पलनायडू यांनी आपल्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “लोकसंख्या वाढीसाठी केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नायडू यांचे आवाहन आणि त्या दोघांनी तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी दिलेल्या ऑफरनंतर अनुषंगाने माझी घोषणा आहे. आम्ही महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहोत आणि तिसरे मूल जन्माला घातल्यास आम्ही प्रोत्साहन देऊ.”

प्रकासम जिल्ह्यातील मरकापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नायडू यांनी बाळंतपणाच्या काळात सर्व महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या मुलांची संख्या कितीही असली तरी प्रसूती रजा दिली जाईल अशी घोषणा केली. याच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये एकप्रकारे राज्यातील तरूणांची संख्या वाढवण्यासाठी महिलांनी शक्य असतील तेवढ्या मुलांना जन्म द्यावा असा संदेश देण्यात आला आहे.

राज्याच्या गृहमंत्री व्ही.अनिता यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबल्सना मुल कितवे आहे याचा विचार न करता प्रसूती रजा दिली जाईल अशी घोषणा केली आहे. आतापर्यंत महिला कर्मचारी विशेषतः महिला पोलीस अधिकार्‍यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जात होती, ज्यामध्ये प्रत्येकी फक्त दोन बाळंतपणासाठी पूर्ण वेतन मिळत होते. पण शनिवारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बाळंतपण कितीव्याही क्रमांकाचे असले तरी हा लाभ दिला जाईल असे जाहीर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्यांदाच निवडून आलेले अप्पलनायडू हे पूर्वी पत्रकार होते. यापूर्वी ते टीडीपी कार्यकर्त्यांना प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण देण्याचे काम करत असतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पहिल्यांदा तिकीट मिळाले ५१ वर्षीय अप्पलनायडू हे २५ वर्षांपासून टीडीपीबरोबर काम करत आहेत. २००४ मझ्ये ते टीडीपीमध्ये सहभागी झाले होते.