एकतर्फी प्रेम अनेकदा लोकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना पाहायला मिळतात. असंच एक प्रकरण झारखंडमध्ये पाहायला मिळालं आहे. एकतर्फी प्रेम झारखंडमधील कोडरमा येथील एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. येथील एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या केली आहे. यासाठी त्या नराधम शिक्षकाने गुंडांना सुपारी दिली होती. येथील डोमचांच पोलीस ठाणे परिसरात राहणारी सोनी कुमारी उर्फ सोनाली कुमारी हिच्या हत्याकांडाचं प्रकरण सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना कठोर शिक्षा दिली आईल, असं डोमचांच ठाण्याचे प्रभारी अब्दुल्लाह खान यांनी सांगितलं.

हे प्रकरण गेल्या आठवड्यातील २१ मार्चचं आहे. सोनी उर्फ सोनाली त्या दिवशी महाविद्यालयात गेली होती. परंतु ती कॉलेजवरून परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. परंतु ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या आई-वडिलांनी डोमचांच पोलीस ठाण्यात सोनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला एक सुमो गाडी आणि डोमचांच येथील त्या गाडीचा मालक रोहित मेहता याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, रोहितकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अजून एक संशयित आरोपी दीपक साव याला ताब्यात घेतलं. तसेच पोलिसांनी अधिक कठोर होत चौकशी केल्यानंतर आरोपींनी सांगितलं की, त्यांनी सोनीची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या एका पाण्याने भरलेल्या खाणीत फेकून दिला आहे.

पोलिसांनी २७ मार्च रोजी सोनीचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर पोलिसांना समजलं की, त्यांनी ज्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे, त्यापैकी एकजण या हत्याकांडामधला प्रमुख आरोपी आहे. दीपक साव असं त्याचं नाव आहे. दीपक पूर्वी सोनीला शिकवायचा (ट्युशन द्यायचा). त्यावेळी त्याचं सोनीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने त्याचं प्रेम सोनीकडे व्यक्त केलं. परंतु सोनीने त्याला नकार दिला. त्यानंतर दीपक संतापला आणि सोनीला धडा शिकवायचं असं त्याने ठरवलं. गेल्या काही दिवसांपासून तो सोनीचा खून करण्याच्या प्रयत्नात होता.

हे ही वाचा >> संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळला

दीपकने १.५० लाखांची सुपारी देऊन चार जणांच्या मदतीने सोनीचा खून केला. कर्ज देण्याच्या बहाण्याने आधी तिला सुमो कारमध्ये बसवून जवळच्या हजारीबाग जिल्ह्यातल्या बरही येथे नेलं. कारमध्ये मोबाईल चार्जरच्या वायरचा वापर करून दीपकने सोनीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याला दगड बांधून पाण्याने भरलेल्या खाणीत फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी रोहित, दीपकसह भरत कुमार उर्फ कारु, संतोष मेहता, संजय मेहता या दोघांना अटक केली आहे.