एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने १ लाख ८७ हजारांचा स्मार्टफोन मागवला पण तो फोन जेव्हा त्याला ऑनलाइन मिळाला तेव्हा त्याच्या आत टाइल होती. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. बंगळुरुतल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअरने हा दावा केला आहे की त्याने सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी जी फोल्ड ७ हा मोबाइल एका इ कॉमर्स अॅपवरुन ऑर्डर केला. त्यासाठी त्याने १ लाख ८७ हजारांचं पेमेंटही केलं. मात्र फोन जेव्हा घरी आला तेव्हा बॉक्स उघडल्यावर त्यात त्याला एक टाइल मिळाली.
नेमकी घटना काय घडली?
बंगळुरुत राहणाऱ्या प्रेमानंद नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सॅमसंग चा गॅलेक्सी जी फोल्ड ७ ऑनलाइन ऑर्डर केला होता. या फोनच्या ऑर्डरसाठी त्याने क्रेडिट कार्डने १ लाख ८७ हजार रुपयांचं पेमेंटही केलं होतं. १४ ऑक्टोबरला त्याने ऑर्डर दिली. त्यानंतर जेव्हा फोन घरी आला तेव्हा त्याने उत्सुकतेने बॉक्स उघडला आणि ते पाहून त्याला धक्का बसला. कारण त्या बॉक्समध्ये चक्क टाइल होती. १९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ही घटना घडली.
प्रेमानंद या इंजिनिअरने काय सांगितलं?
प्रेमानंद या सॉफ्टवेअर इंजिनिअरने या घटनेनंतर पोलिसात धाव घेतली. त्याने फोनचा बॉक्स अनबॉक्स करतानाचा व्हिडीओ तयार केला होता. फोनच्या बॉक्समध्ये टाइल मिळाली हे त्या व्हिडीओतच समोर आलं. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ आणि कलम ३१९ च्या अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदवला. आता या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान अॅमेझॉनला या सगळ्या प्रकाराची माहिती प्रेमानंदने दिली आणि फोन अनबॉक्स करतानाचा व्हिडीओही दाखवला. ज्यानंतर अॅमेझॉनने १ लाख ८७ हजारांची रक्कम प्रेमानंदला परत केली आहे.
