Tehran Water Crisis : इराणची राजधानी तेहरान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या शहरात एक कोटींहून अधिक लोक राहतात. या शहरावर मोठं जलसंकट निर्माण झालं आहे. पुढच्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पाण्याचं रेशनिंग सुरू करावं लागेल असं इराणच्या सरकारने म्हटलं आहे. पाण्याचं रेशनिंग म्हणजे लोकांना मर्यादित तथा ठराविक प्रमाणात पाण्याचं वाटप केलं जाईल.
तेहरानमधील पाण्याचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. अमीर कबीर धरण व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ एक षष्ठांश (१/६) पाणी शिल्लक आहे. इराणच्या अर्ध्याहून अधिक भागात गेल्या कित्येक महिन्यांमध्ये पाऊस पडलेला नाही. तेहरान व आसपासच्या शहरांत पाऊस न पडल्याने दिवसातून काही वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. इराणमधील अनेक धरणं कोरडी पडली आहेत. जलविभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की तेहरानमधील पिण्याचं पाणी दोन आठवड्यांमध्ये संपेल.
…तर तेहरान रिकामं करावं लागेल : राष्ट्राध्यक्षांचा इशारा
इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इशारा दिला आहे की “नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस पडला नाही तर शिल्लक असलेलं पाणी लोकांमध्ये वाटावं लागेल. डिसेंबरमध्ये देखील दुष्काळ कायम राहिला तर तेहरान रिकामं करावं लागेल. हे भयंकर असलं तरी वास्तव आहे. इरान गेल्या अनेक दशकांमधील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे.”
दुष्काळाचं कारण काय?
इराणमधील दुष्काळाबद्दल सरकारने हवामान बदलाला दोष दिला आहे. इराणचे अध्यक्ष म्हणाले, “हवामान बदलत आहे, उष्णतेच्या लाटा येत आहे. तापमान ५० अंशांपेक्षा जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. तेहरान व आसपासच्या प्रदेशात कित्येक महिने पाऊस पडलेला नाही.” मात्र, हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे की हे केवळ अर्ध सत्य आहे. खरी समस्या मानवनिर्मित आहे. दशकांपासूनच्या चुकांचे हे परिणाम आहेत आणि इराणमधील जनतेला ते भोगावे लागत आहेत.
इराणवर भीषण जलसंकट
इराणमधील पाण्याच्या एकूण साठ्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं. मात्र, इराणमध्ये अजूनही पारंपरिक शेती केली जाते. इराणमध्ये भात व गव्हासारखी अधिक पाण्याची गरज असलेली पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या शेतीलाही यंदा फटका बसला आहे. नद्या कोरड्या पडत आहे. जायदेनेह रुदसारख्या नद्या आता बारमाही राहिलेला नाहीत. त्या हंगामी प्रवाही बनल्या आहेत. पाणथळ जमीन नष्ट होत आहे.
