हरयाणात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देऊन जननायक जनता पार्टीने मतदारांचा विश्वासघात केला आहे, असे सांगून सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेजबहादूर यादव यांनी शनिवारी या पक्षाचा त्याग केला. सैनिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबद्दल तक्रार करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर यादव यांना २०१७ साली बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध कर्नाल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी जेजेपीमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत ते ३१७५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘‘तुम्ही भाजपशी समझोता केला, तर मी पक्ष सोडेन असे मी पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते’’, असे यादव यांनी पीटीआयला सांगितले. जेजेपी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे सांगून यादव यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टीवर टीका केली. भाजपला समर्थन देऊन त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, असे यादव म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2019 रोजी प्रकाशित
तेजबहादूर यादव ‘जेजेपी’तून बाहेर
भाजपला समर्थन देऊन त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-10-2019 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tej bahadur yadav out of jjp abn