Tej Pratap Yadav Estranged Wife Aishwarya Rai: लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर कथित प्रेयसी अनुष्का यादव यांचा फोटो टाकत प्रेमाची कबुली दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात वादळ निर्माण झाले. सदर पोस्ट डिलिट करत आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा तेज प्रताप यांनी केला होता. मात्र लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी केल्यानंतर या प्रकरणाला वादळी स्वरुप प्राप्त झाले. आता तेज प्रताप यादव यांची पूर्व पत्नी ऐश्वर्या राय यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण यादव कुटुंबावर आरोप केले आहेत.
ऐश्वर्या राय या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांच्या नात आहेत. २०१८ साली त्यांचे तेज प्रताप यादव यांच्याशी लग्न झाले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांचा वाद होऊन त्यांनी यादव कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांच्यावर कारवाई केली, अशावेळी ऐश्वर्या राय यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे. त्या म्हणाल्या की, संपूर्ण यादव कुटुंब खोटारडे आहे. ते अजिबात वेगळे झाले नसून आतून ते सर्व एकत्रच राहतात.
माझे आयुष्य का उध्वस्त केले?
तेज प्रताप यादव यांनी फेसबुक पोस्टमध्ये अनुष्का यादव यांच्याशी १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडत ऐश्वर्या राय म्हणाल्या की, जर १२ वर्षांपासून तेज प्रताप यांचे संबंध होते, याचा अर्थ यादव कुटुंबाला याची माहिती होती. तरीही त्यांनी २०१८ साली माझे लग्न का लावून दिले. या लग्नामुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले. यादव कुटुंबाने माझे आयुष्य उध्वस्त का केले?
तेव्हा तुमचा सामाजिक न्याय कुठे गेला होता?
तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत असताना लालू प्रसाद यादव यांनी सामाजिक न्यायाचा संदर्भ दिला होता. यावर बोलताना ऐश्वर्या राय म्हणाल्या की, यादवांच्या घरात मला मारझोड झाली, तेव्हा सामाजिक न्याय कुठे गेला होता. माझ्या सामाजिक न्यायाचे काय? माझ्या घटस्फोटाची माहितीही मला माध्यमातून कळली. आताही तेज प्रताप यांचे प्रकरण माध्यमातूनच मला कळले.
बिहारच्या निवडणुकीसाठी खेळी
ऐश्वर्या राय यांनी सासू राबडी देवी यांच्यावरही टीका केली. आगामी बिहार निवडणुकांसाठी यादव कुटुंबाकडून हे नाटक सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मुलाला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले असावे. जेव्हा मला मारझोड होत होती, तेव्हा तुमचा विवेक कुठे गेला होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.