बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना तेजस्वी यादव यांनी मात्र महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळे बिहारमध्ये पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसंच पत्रकार परिषदही घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांनी यावेळी आरजेडीच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे. विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होते हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.

तेजस्वी यादव यांनी यावेळी नितीश कुमार यांच्यावर टीका करत तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कट रचणं सोडून द्या असा टोला लगावला. “त्यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या पदावरुन मागे हटलं पाहिजे. याआधी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याबद्दल सांगितलं होतं. राजकारणातील आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी असं काही अनादर वाटणारं काम करु नये,” असा सल्ला तेजस्वी यादव यांनी दिला आहे.

तेजस्वी यादव यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही नाराजी व्यक्त केली. “जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने होता, पण निवडणूक आयोगाचा निर्णय एनडीएच्या बाजूने होता. पण हे पहिल्यांदा झालेलं नाही. २०१५ मध्येही जेव्हा महागठबंधन झालं होतं तेव्हाही निकाल आमच्या बाजूने होता, पण भाजपाने मागच्या दरवाजाने प्रवेश केला” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. तेजस्वी यादव यांनी मतमोजणी प्रक्रियेत असणाऱ्या पळवाटा सांगितल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashwi tells rjd mahagathbandhan will form govt sgy
First published on: 12-11-2020 at 16:43 IST