भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी आणि त्यांचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. अशाच प्रकारची चर्चा गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये सुरू आहे. भाजपानं तेलंगणा राष्ट्र समितीच्या तीन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा टीआरएसकडून करण्यात आला आहे. पण यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चक्क मंदिरात ओल्या कपड्यांनिशी शपथेवर “विरोधकांचे आमदार फोडले नाहीच” असं म्हटलं आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं झालं काय?
दोन दिवसांपूर्वी हैदराबादच्या मोईनाबाद रस्त्यावर असणाऱ्या अजीझ नगर परिसरातील फार्महाऊसवर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.स्थानिक टीआरएस आमदारांना पक्ष सोडण्यासाठी तीन इसमांनी मोठी रक्कम देऊ केल्याचा आरोप या आमदारांकडून करण्यात आला होता. त्यांच्याच बोलवण्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तीन जणांना मोठ्या रोख रकमेसह अटक केली. आमदारांना १०० कोटी देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचाही आरोप टीआरएसकडून करण्यात आला आहे.
“देशातील परिस्थिती पाहता…” राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चे स्वरा भास्करने केले कौतुक
प्रदेशाध्यक्षांचा ‘शपथविधी’!
दरम्यान, तेलंगणा राष्ट्र समितीच्या आरोपांमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर हे आरोप खोडून काढण्यासाठी तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बांडी संजय यांनी थेट येदाद्रीमधलं श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरच गाठलं. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ते या मंदिरात पोहोचले. गाभाऱ्यासमोर ओल्या कपड्यांनिशी जात त्यांनी या सगळ्या प्रकाराच आपला किंवा पक्षाचा काहीही हात नसल्याचं शपथेवर सांगितलं. मोईनाबाद फार्महाऊसवर घडलेल्या प्रकारामध्ये भाजपाचा काहीही हात नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांना आव्हान!
दरम्यान, एकीकडे बांडी संजय यांनी भाजपावरील आणि त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावतानाच दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही आव्हान दिलं आहे. “माझ्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनीही इथे येऊन अशाच प्रकारे शपथेवर हे सगळं सांगून दाखवावं”, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री आणि टीआरएसच्या त्या आमदारांनी लाय डिटेक्टर टेस्टला सामोरं जावं, असंही बांडी संजय माध्यमांना म्हणाले.