तेलंगणच्या रंगा रेड्डी जिल्ह्यामध्ये सोमवारी एक लॉरी ट्रकने राज्य परिवहन महामंडळाच्या (टीजीएसआरटीसी) बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे किमान १९ प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये ४१ दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे. त्याशिवाय अन्य २२ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.

हैदराबादपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर चेवेल्ला येथे सोमवारी सकाळी सात वाजता रेती आणि दगड भरलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यामुळे बस अक्षरशः कापली गेली. बसमधील वाचलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने बसचालकाच्या बाजूने बसलेल्या प्रवाशांचा मृतांमध्ये अधिक करून समावेश होता. तर चालकाच्या बाजूने बसलेल्या प्रवाशांपैकी अनेकांना आपला जीव वाचवता आला. बसमधून ७२ प्रवासी प्रवास करत होते.

टीजीएसआरटीसीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि अनेक वाहनांना मागे टाकत तो थेट बसवर येऊन आदळला. ट्रकमधील रेती आणि दगडही बसवर आदळले आणि त्यामुळे अधिक नुकसान झाले. अपघातानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. त्यांना श्वास न घेता येणे, घुसमटणे सासारखे त्रास झाले. तसेच अनेक दुखापती झाल्या.

पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. तर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.