Telangana Chemical Factory Blast: सोमवारी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या रिअॅक्टर स्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून, ३४ जण जखमी झाले आहेत. स्फोटावेळी कारखाण्याच्या इमारतीत ५० हून अधिक लोक होते आणि अनेक जण अजूनही आत अडकले आहेत. “सुटका करण्यात आलेल्यांपैकी काही जण गंभीर जखमी आहेत. आत किती लोक अडकले आहेत हे आम्हाला अद्याप कळलेले नाही,” असे पोलीस सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव आणि मदत कार्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आग विझवण्याचे काम सुरू आहे आणि काही लोक अजूनही इमारतीत अडकले आहेत.”
पंतप्रधानांनी जाहीर केली आर्थिक मदत
तेलंगणामधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत लिहिले की, “तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यातील आगीच्या घटनेत झालेल्या मृत्यूंमुळे मला दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये मदत दिली जाईल. तर जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.”
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी घटनास्थळी अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आणि जखमींना त्वरित आणि पुरेशी वैद्यकीय सेवा देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
तेलंगणाचे माजी मंत्री आणि बीआरएस नेते टी हरीश राव म्हणाले, “आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे ५०-६० लोक अजूनही कारखान्यात आहेत, अजूनही त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाही. बचाव कार्य सुरू आहे. आम्ही सरकारकडे मृतांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये आणि जखमींना ५० लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.”