तेलंगणामध्ये एक आगळंवेगळं लग्न नुकतंच पाहायला मिळालं आहे. येथील आदिवासी समुदायातील एका व्यक्तीने एकाच मांडवात दोन महिलांशी लग्न केलं आहे. या दोघींसोबत तो तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. हे प्रकरण भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील एका गावातलं आहे. या गावात आदिवासी लोकांची संख्या मोठी आहे. तिथलंच हे प्रकरण आहे. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही महिलांना लग्नाआधीच एकेक मूलदेखील आहे. ही दोन्ही मुलं याच आदिवासी तरुणाची आहेत.

योराबोरू गावातील सत्तीबाबू नावाच्या तरुणाचं वेगवेगळ्या गावांमधील स्वप्ना आणि सुनिता या दोन तरुणींवर प्रेम होतं. तो या दोघींसोबत गेल्या ३ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहात आहे.

दोघींना लग्नाआधीच दोन मुलं!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वप्ना आणि सुनिता या दोघींना सत्तीबाबूपासून दोन मुलं झाली आहेत. स्वप्नाला एक मुलगा आहे, तर सुनिताला एक मुलगी आहे. या दोघींना एकाच पुरुषासोबत लग्न करण्यात कोणतीही अडचण नव्हती. हे लग्न होण्याआधी तिन्ही कुटुंबांमध्ये मोठी हाणामारी देखील झाली होती. परंतु सत्तीबाबू त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळेच हे लग्न होऊ शकलं. सत्तीबाबू, स्वप्ना आणि सुनितासमोर तिन्ही कुटुंबं अखेर नरमली आणि त्यांनी या लग्नाला सहमती दर्शवली.

हे ही वाचा >> Love Jihad : “मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी”, अबू आझमींची मागणी, गुलाबराव म्हणाले “माझ्या गावी चला…”

निमंत्रणपत्रिका व्हायरल झाल्यामुळे लग्नाला पत्रकारांची हजेरी

अशा प्रकारची लग्नं आपला समाज सहज स्वीकारत नाही. सत्तीबाबूलादेखील समाजाचा विरोध पत्करावा लागला. त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेवर त्याने त्याच्या दोन्ही वधूंची नावं छापली होती. त्यामुळे ही लग्नपत्रिका व्हायरल झाली. त्यामुळे काही पत्रकार देखील या लग्नाला पोहोचले. तिन्ही परिवारांना भिती होती की, प्रशासन हे लग्न रोखू शकतं. त्यामुळे त्यांनी ठऱलेल्या मुहुर्ताच्या आधीच लग्न उरकलं.